शेवगाव : येथील सुजन ग्रामगौरव समिती यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार व छायाचित्रकार लक्ष्मण स. झिंज


शेवगाव : येथील सुजन ग्रामगौरव समिती यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार व छायाचित्रकार लक्ष्मण स. झिंजुर्के तसेच हस्तलिखित ज्ञानेश्वरीकार रमेश भारती गुरु शंकर भारती यांना सत्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या मान्यवरांचा ‘ग्रामगौरव सन्मान’ सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शेवगाव येथील स्वराज मंगल कार्यालय, आखेगांव रोड येथे होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पुरुषोत्तम भापकर (आय.ए.एस.), माजी विभागीय आयुक्त, मराठवाडा हे राहणार आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार बैजू पाटील तसेच सद्गुरू जोग महाराज संस्थान, आखेगाव येथील ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून दीपक सुधाकर कुलकर्णी (लेखक व व्याख्याते, सातारा), संतोष काकडे (निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती) तसेच माया मुंडे (नगराध्यक्ष, शेवगाव) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन सुजन ग्रामगौरव समितीचे अध्यक्ष प्रा. दिलीप फुलके, उपाध्यक्ष प्रा. किशन माने, सचिव प्रा. कचरूदास सारडा तसेच समितीचे सदस्य रामेश्वर जाजू, मिर्झीलंद काटे, कन्हैय्या सारडा आणि उमेश घेवरीकर यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

COMMENTS