शिर्डी : शिर्डी येथील चर्मकार बांधवांच्या वतीने नगराध्यक्ष जयश्री थोरात तसेच उप नगराध्यक्ष अभय राजे शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आ

शिर्डी : शिर्डी येथील चर्मकार बांधवांच्या वतीने नगराध्यक्ष जयश्री थोरात तसेच उप नगराध्यक्ष अभय राजे शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन नगरसेवक बापू ठाकरे, प्रसाद सुरंजे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शिर्डीतील चर्मकार बांधव गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने फुटपाथवर बूट-चप्पल दुरुस्ती व पॉलिशचा व्यवसाय करत आहेत. हा व्यवसाय करताना कोणालाही त्रास होणार नाही तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेत प्रामाणिकपणे उपजीविका केली जात आहे. या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
मात्र, शिर्डी नगरपालिकेकडून गेल्या १५ ते २० दिवसांपासून फुटपाथवरील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आल्याने चर्मकार बांधवांसह इतर लघु व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे दैनंदिन घरखर्च, मुलांचे शैक्षणिक शुल्क तसेच इतर आवश्यक खर्च भागविणे कठीण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरपालिकेने या विषयात सकारात्मक भूमिका घेऊन चर्मकार बांधवांना पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर राजू सुरंजे, संतोष पवार, बाळासाहेब सुरंजे, हिरामण अहिरे, सोमनाथ शिलावर समाधान सुरंजे, बाळू अहिरे आदींच्या सह्या आहेत. आता पालिका काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS