कर्जत : परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त चंदनबाला बहुमंडळ मंडळ, कर्जत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंद चालीसा पठ

कर्जत : परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त चंदनबाला बहुमंडळ मंडळ, कर्जत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंद चालीसा पठण कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी समर्थ माध्यमिक विद्यालयात भक्तिमय वातावरणात झाला. नवकार मंत्राच्या सामूहिक पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आनंद ऋषीजी महाराजांच्या विचारांचा जागर करून समाजात संस्कार, सदाचार आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी नगराध्यक्षा उषाताई राऊत, कोपरगाव येथील कविताताई पारख, देवळाली प्रवरा येथील कांचनबाई देसरडा, चंदनबाला बोरा, प्रसाद शहा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी अनिता बोरा यांनी उपस्थितांकडून नवकार मंत्राचे सामूहिक पठण करून घेतले.
यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, “परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांनी सत्य, अहिंसा, सेवा आणि सदाचाराची शिकवण देत समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास सुसंस्कृत आणि सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकते.” आपल्यासाठी अभिमानाची बाब अशी आहे की परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आहे. हा जिल्हा संतांची भूमी असून. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आज सर्व समाज या ठिकाणी चालत आहे.
माजी नगराध्यक्षा उषा राऊत यांनी सांगितले, “आनंद ऋषीजी महाराजांचे जीवन हे त्याग, करुणा आणि आत्मसंयमाचा आदर्श आहे. त्यांच्या शिकवणीतून प्रत्येकाने नैतिक मूल्ये आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी.”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आनंद ऋषीजी महाराजांच्या जीवनकार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा समाजात अधिक व्यापक प्रसार करण्याचे आवाहन केले. आनंद चालीसा पठणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंदनबाला बहुमंडळ मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS