बीड: गेल्या मराठवाडा मुक्ती दिनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रथमच बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली. स्व. अजितदादांनी यासाठी गती देण्याचं काम केलं. याचाच प

बीड: गेल्या मराठवाडा मुक्ती दिनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रथमच बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली. स्व. अजितदादांनी यासाठी गती देण्याचं काम केलं. याचाच पुढचा भाग म्हणून त्यांची स्वप्नपूर्ती व्हावी यासाठी यंदाच्या मराठवाडा मुक्ती दिनी (१७ सप्टेंबर २०२६) बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याची पूर्ण तयारी असल्याची माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
आज एका बैठकीत रेल्वे विकासाबाबत स्वतंत्र आढावा घेण्यात आला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही महत्त्वाची माहिती दिली.
अहिल्यानगर-परळी रेल्वे मार्गातील बीडपर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत पहिली रेल्वे धावली होती, ज्यामुळे बीडकरांचे तब्बल चार दशकांचे स्वप्न साकार झाले.
त्यानंतर आता वडवणीपर्यंतचे काम पूर्ण झाले असून त्याची यशस्वी चाचणीदेखील पार पडली आहे. वडवणीपासून पुढे परळीपर्यंतच्या कामालाही आता गती देण्यात आली आहे. केंद्रासमवेत योग्य समन्वय राखून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिले. तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारतर्फे कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

COMMENTS