शेवगाव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या ग्रामपंचायत मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती सोशल मीडियासह विविध

शेवगाव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या ग्रामपंचायत मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती सोशल मीडियासह विविध माध्यमांतून प्रसारित केल्याप्रकरणी शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश भालसिंग (रा. वाघोली, ता. शेवगाव) आणि शिवाजी भिसे यांनी मोबाईल, सोशल मीडिया पोस्ट, स्टेटस, संपादित छायाचित्रे तसेच अन्य माध्यमांचा वापर करून कोणताही ठोस पुरावा नसताना बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. या मजकुरातून फिर्यादींना “भ्रष्ट अधिकारी” असे संबोधून त्यांच्या वैयक्तिक तसेच प्रशासकीय प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, परवानगीशिवाय फेसबुकवरील छायाचित्रांचा वापर करून त्यावर बदनामीकारक मजकूर जोडून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. तसेच ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिल्यानंतर शासकीय कामकाजात अडथळे निर्माण करण्याच्या उद्देशाने निषेधात्मक पोस्ट प्रसारित करून जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर गुरुवारी (दि. ६) वाघोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी भाऊसाहेब आगलावे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात प्रतितक्रार दाखल केली. गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असून तो तातडीने रद्द करण्यात यावा, तसेच त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाघोली ग्रामपंचायतीच्या विहीर खरेदी प्रस्तावासंदर्भात झालेल्या भेटीदरम्यान हा प्रकार घडल्याचा दावा प्रतितक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे. यावेळी विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने शेवगाव पोलिस ठाण्यात उपस्थित होते.
दोन्ही प्रकरणांबाबत शेवगाव पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे समजते.

COMMENTS