निघोज : राज्याचा अनमोल ठेवा म्हणून पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या निघोज परिसरातील जगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात

निघोज : राज्याचा अनमोल ठेवा म्हणून पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या निघोज परिसरातील जगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. निघोज एस टी बस स्थानक ते रांजणखळगे चार किलोमीटर रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. खासदार नीलेश लंके व आमदार काशिनाथ दाते यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन केंद्र सरकार किंवा राज्य सरकार माध्यमातून या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी पर्यटक, ग्रामस्थ यांनी सोशल मीडिया माध्यमातून केली आहे.
गेली आठ वर्षांपूर्वी आमदार विजय औटी यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम झाले होते. मात्र जड वाहतूक जास्त प्रमाणात असल्याने आणी पाऊसाचे प्रमाण जास्त असल्याने या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली. जागोजागी खाचखळगे मोठ्या प्रमाणात असल्याने कुंड पर्यटन पाहाणारे पर्यटक, मळगंगा देवी दर्शनासाठी जाणारे भाविक व प्रवासी तसेच परिसरातील शेतकरी, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ तसेच भाविक यांच्या लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे.
या ठिकाणी पर्यटक निवास व भोजन कक्ष याचे काम खा. नीलेश लंके यांनी जवळपास साडे पाच कोटी निधी उपलब्ध करून पूर्ण झाले आहे. यामध्ये खंडोबा पाऊतके ते शिरुर बाह्यवळण रस्त्याचा सहभाग आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी सातत्याने या ठिकाणी असते. मळगंगा देवीचे मंदिर त्याठिकाणी आहे भावीकांची गर्दी सातत्याने असते. तसेच निघोज – टाकळी हाजी, गणपती रांजणगाव जाण्यासाठी हा रस्ता प्रवाशांना कमी अंतराचा असल्याने पुण्याकडे जाण्यासाठी प्रवासी याच रस्त्याचा वापर करतात मात्र रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्याचे काम होण्याची गरज आहे. निघोज गावची लोकसंख्या मोठी आहे. याठिकाणी पाच पन्नास लाखांची कामे करण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावर किमान दहा ते बारा कोटी रुपये खर्च होईल अशाप्रकारे निधी उपलब्ध करून दयावा जेणेकरून भविष्यात दहा ते पंधरा वर्षाचा रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटला जाईल अशी मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणात होत आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज जगप्रसिद्ध रांजणखळगे, मळगंगा तिर्थक्षेत्र आणी पुण्याकडे जाणारा कमी अंतराचा रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहने दररोज हजारोंच्या संख्येने जा ये करतात. शिवाय कांदा वाहतूक, दूध वाहतूक, भाजीपाला वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने जड वाहनांची संख्या खूप आहे. त्यातच हा रस्ता अरुंद आहे. यासाठी रस्त्याचे काम करताना दोन्ही बाजूने रुंदीकरण तसेच पाणी जाण्यासाठी गटारींची व्यवस्था करण्याची गरज आहे. तसेच प्रवाशांसाठी स्वच्छतागृह याची उपलब्धता होण्याची गरज आहे अशी मागणी भाविक,पर्यटक ग्रामस्थ यांनी केली आहे.

COMMENTS