पुणे, दि. 20 मे : पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीसंघर्षाने हिंसक रूप धारण केले असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या भा

पुणे, दि. 20 मे : पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीसंघर्षाने हिंसक रूप धारण केले असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या भावाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बालाजीनगर परिसरात बुधवारी भरदिवसा झालेल्या या थरारक हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मृत तरुणाचे नाव अक्षय बापू म्हस्के उर्फ बाळा (वय 26, रा. आंबेगाव पठार) असे असून, तो वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आकाश म्हस्के याचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, हल्लेखोरांनी बालाजीनगर परिसरात आधीच सापळा रचून अक्षय म्हस्के याच्यावर जवळून गोळीबार केला. त्याला तीन गोळ्या लागल्याने तो जागीच कोसळला. त्यानंतरही हल्लेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर व चेहर्यावर वार केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अक्षय म्हस्के याच्यावर यापूर्वीही तीन वेळा जीवघेणे हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रत्येक वेळी तो बचावला होता. चौथ्या हल्ल्यात मात्र हल्लेखोरांनी त्याचा काटा काढल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आकाश म्हस्के याचे नाव प्रमुख संशयित म्हणून पुढे आले होते. आंदेकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल मध्य प्रदेशातून आणण्यात त्याची भूमिका असल्याचा तपास यंत्रणांचा दावा होता. तसेच या कटात त्याने सक्रिय सहभाग घेतल्याचेही समोर आले होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून ओळखला जाणारा सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा आकाश म्हस्के हा निकटवर्तीय मानला जात होता. आंदेकर यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, पाळत ठेवणे आणि हल्ल्याची तयारी करणे यामध्ये या टोळीचा सहभाग असल्याचा आरोप तपासादरम्यान करण्यात आला होता. त्यानंतर आंदेकर यांच्यावर गोळीबार करून धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली होती. सध्या आकाश म्हस्के कारागृहात असून, त्याच्या भावाच्या हत्येमागे सूडभावना कारणीभूत असावी, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS