मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्यांदरम्यान भारताची प्रतिमा जपण्याच्या भू

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्यांदरम्यान भारताची प्रतिमा जपण्याच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. राजकीय मतभेद असले तरी देशाची प्रतिष्ठा राखण्याचे कार्य पंतप्रधान करत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या या भूमिकेशी असहमती दर्शवत पंतप्रधानांवर टीका केली.
शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख मजबूत करण्याचे काम ते करत आहेत. राजकीय विचार वेगळे असले तरी देशहिताच्या मुद्द्यावर वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूर्वीच्या पंतप्रधानांनी परदेश दौर्यांदरम्यान पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, असे सांगत त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, पी.व्ही. नरसिंहराव यांचा यांचा उल्लेख केला. राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच अनेक देशांचा दौरा केला. मात्र, परदेशी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देण्याऐवजी संवाद टाळल्याचे चित्र दिसून आले. हे लोकशाही आणि देशाच्या प्रतिष्ठेसाठी गंभीर असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, संसदेत भाषण करून बाहेर पडणे, पत्रकार परिषदांना टाळणे आणि माध्यमांशी संवाद न साधणे, या मुद्द्यांवरूनही राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

COMMENTS