नांदेड : स्नेहनगर येथील डॉ. नारायणराव भालेराव हायस्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनि

नांदेड : स्नेहनगर येथील डॉ. नारायणराव भालेराव हायस्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दिग्रसकर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून स्वामी व्ही. एम. उपस्थित होत्या. पवार ए. व्ही. यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणे सादर केली. लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात निर्माण केलेली जनजागृती, शिक्षण आणि राष्ट्रवादाचा विचार यावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून वंचित समाजाला दिलेला आवाज, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बजावलेली भूमिका आणि सामाजिक समतेचा संदेश याचे प्रभावी विवेचन केले. महापुरुषांचे विचार केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख घाटे बी. जी. यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जोशी ए. जी., मोरे पी. एस., कुलकर्णी, करखेले बी. एम., बकाल आर. सी., जाधव एस. आर. तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

COMMENTS