नांदेड : तब्बल ४४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य सहस्त्रकुंड येथे भगवान परशुराम यांच्या मूर्तीची विधिवत पुनःप्रतिष्ठापना

नांदेड : तब्बल ४४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य सहस्त्रकुंड येथे भगवान परशुराम यांच्या मूर्तीची विधिवत पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर आणि श्री सहस्त्रकुंड बाणगंगा महादेव मंदिर तीर्थक्षेत्र धर्मदाय ट्रस्टचे सचिव सतीश शंकरराव वाळकीकर यांच्या पुढाकारातून हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा पार पडला.
सहस्त्रकुंड परिसराचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी व किनवटचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांचे विशेष सहकार्य लाभत असून ४७ हेक्टरचा सातबारा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सन १९८२ मध्ये आलेल्या महापुरात सहस्त्रकुंड परिसरातील भगवान परशुरामाचे मंदिर आणि इतर देवतांच्या मूर्ती वाहून गेल्या होत्या. त्यानंतर अनेक वर्षे या पवित्र स्थळाच्या पुनर्विकासाची अपेक्षा होती. अखेर स्थानिक ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते आणि ब्राह्मण महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भगवान परशुराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून या ऐतिहासिक स्थळाला नवसंजीवनी मिळाली आहे.
भगवान परशुराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आली असून त्यासाठी अनिल भोरे, देशपांडे काका, अनिल डोईफोडे, महावीर शेठ, पवार काका, संतोष कुलकर्णी, शशिकांत पाटील, कृष्णा उमरीकर यांनी सहकार्य केले. महाराष्ट्र शासन आणि पर्यटन विभागाने सहस्त्रकुंडचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश केला असून जिल्हाधिकारी यांच्या विशेष लक्षातून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सौर व स्ट्रीट लाईट, यात्री निवास तसेच भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्याची कामे सुरू आहेत. परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष कृती आराखडाही राबविण्यात येत आहे.
काळ्याभोर बेसॉल्ट खडकांवरून कोसळणारा शुभ्र धबधबा, त्याचा निनाद, नदीच्या मध्यभागी असलेली परशुराम टेकडी, गोमुख तीर्थ, सीतामाईची नान्ही आणि बाणगंगा महादेव मंदिर यामुळे सहस्त्रकुंड हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण ठरत आहे. प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी मराठवाड्यासह राज्यभरातील भाविकांना सहस्त्रकुंड येथे भगवान परशुरामांचे दर्शन घेण्याबरोबरच येथील अद्वितीय निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले. तर ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी या तीर्थक्षेत्राचा विकास आदर्श धार्मिक-पर्यटन केंद्र म्हणून करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सहस्त्रकुंडचा विकास पूर्ण झाल्यानंतर हे स्थळ धार्मिक श्रद्धा आणि निसर्ग पर्यटनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS