किनवट : ज्ञानाच्या पवित्र मंदिरात अखंड सेवायज्ञ तेवत ठेवून हजारो मनांमध्ये ज्ञानाचे दीप उजळवणार्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बेंदी ता

किनवट : ज्ञानाच्या पवित्र मंदिरात अखंड सेवायज्ञ तेवत ठेवून हजारो मनांमध्ये ज्ञानाचे दीप उजळवणार्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बेंदी तांडा येथील आदरणीय सहशिक्षिका मीना देवराव नरपडवार यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच अत्यंत भावूक, देखण्या आणि मंगलमय वातावरणात पार पडला. आयुष्याची प्रदीर्घ वर्षे बालमनांना घडवण्यात वेचल्यानंतर, निरोपाच्या या क्षणी त्यांनी जपलेली दातृत्वाची वेल अधिकच बहरली.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून मुख्याध्यापक राठोड सर, भूसंवार सर, नोळे सर, मुंडकर सर व सेवानिवृत्त शिक्षक राठोड सर यांनी श्रीमती नरपडवार यांच्या शैक्षणिक प्रवासातील समिधांचा शब्दरुपी गौरव केला. त्यांच्या अध्यापनातील तळमळ, चेहर्यावरचे वात्सल्यपूर्ण हास्य आणि अथांग कर्तव्यनिष्ठा ही नव्या पिढीसाठी कायमच आदर्शाचा वस्तुपाठ राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त करत त्यांच्या आगामी निसराम आयुष्यासाठी स्नेहार्द्र शुभेच्छा दिल्या.
निरोपाचा तो भावुक क्षण केवळ औपचारिकतेत वाहून जाऊ न देता, मॅडमांनी आपल्यातील दातृत्वाचे एक सुंदर पान या निरोपाच्या पुस्तकात जोडले; शाळेतील पहिली ते सातवीत शिकणार्या १२८ बालकांना त्यांनी स्वखर्चातून नवीन गणवेश भेट दिले. आपल्या लाडक्या शिक्षिकेने दिलेला हा आपुलकीचा पेहराव परिधान करताना चिमुकल्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. सहवासाचे धागे सुटत असताना डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि चेहर्यावरचे समाधान, या द्वैतातून त्यांचा अंतरात्माच जणू या शाळेला मायेचे अलवार आलिंगन देत होता.
गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी आणि बालकांच्या साक्षीने शाळेच्या वतीने शाल अन् श्रीफळ देऊन त्यांचा भावपूर्ण नागरी सत्कार करण्यात आला. निवृत्तीच्या दिवशीही केवळ दातृत्वाचा झरा वाहता ठेवणार्या एका ऋषितुल्य शिक्षिकेच्या या अलौकिक औदार्याची गाथा संपूर्ण बेंदी तांडा परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.

COMMENTS