वडवणी तालुक्यातील कवडगाव येथून श्रीक्षेत्र चाकरवाडीपर्यंत निघणार्या पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून यंदा हा भक्तिमय सोहळा अधिक

वडवणी तालुक्यातील कवडगाव येथून श्रीक्षेत्र चाकरवाडीपर्यंत निघणार्या पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून यंदा हा भक्तिमय सोहळा अधिक उत्साहात आणि श्रद्धाभावाने पार पडणार आहे. सद्गुरु श्री संत माऊली दादा चाकरवाडीकर महाराज यांच्या 26 व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याला यंदा 20 वर्षे पूर्ण होत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवार, दि. 24 जून 2026 रोजी सकाळी ग्रामप्रदक्षिणा आणि बजरंगबलीच्या दर्शनाने दिंडीचे प्रस्थान होणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड घोषात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघणारी ही दिंडी पुढील पाच दिवस विविध गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. दिंडीच्या प्रवासात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. शेकडो वारकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक या सोहळ्यात सहभागी होत भक्तीचा अनोखा अनुभव घेतात. दिंडीचा पहिला मुक्काम 24 जून रोजी भगवान बाबा प्रतिष्ठान, वडवणी येथे होणार आहे. त्यानंतर 25 जून रोजी खडकी, 26 जून रोजी कोरडेवाडी आणि 27 जून रोजी देवगाव येथे मुक्काम करण्यात येणार आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी हरिजागर, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून जाणार आहे. रविवार, दि. 28 जून रोजी सायंकाळी दिंडी श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे दाखल होईल. त्यानंतर सोमवार, दि. 29 जून रोजी सकाळी चाकरवाडी नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार असून दिंडी सभामंडपात पोहोचेल. यावेळी संत माऊली दादा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच हरिनाम सप्ताहाचा समारोपही याच दिवशी होणार असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडतील. दिंडी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रवासात घुमणारा विठ्ठल नामाचा गजर. माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली आणि जय हरी विठ्ठल या नामघोषाने वातावरण भक्तिमय बनते. वारकरी परंपरेचे जतन आणि संतांच्या विचारांचा प्रसार हे या दिंडीमागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. भाविकांच्या सोयीसाठी दिंडीदरम्यान जेवण, चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी तसेच मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. गेल्या दोन दशकांपासून ही दिंडी श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा संदेश देत समाजात आध्यात्मिक एकात्मता निर्माण करत आहे. ह.भ.प. अशोक महाराज चोले, प्रमोद आप्पा पटाणे, सूर्यकांत चांभरे सर, आबा काळे, डॉ. भागवत आरडे, विणेकरी रंगनाथ चांदर, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ कवडगाव आणि माऊली भक्त परिवार यांच्या वतीने सर्व वारकरी, भक्तगण आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि संतपरंपरेचा वारसा जपणारा हा दिंडी सोहळा भाविकांसाठी खर्या अर्थाने आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

COMMENTS