बीड : वंचित, उपेक्षित आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणार्या प्रा. डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे (बीड) यांना

बीड : वंचित, उपेक्षित आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणार्या प्रा. डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे (बीड) यांना विवेक विचार मंचतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे. सामाजिक न्याय, शिक्षण, जनजागृती आणि समाजप्रबोधन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येत आहे.
प्रा. डॉ. मोरे यांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत शिक्षणाच्या माध्यमातून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर त्यांनी संशोधन, मार्गदर्शन आणि जनजागृतीचे काम प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून विवेक विचार मंचाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 28 जून 2026 रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, पद्मश्री दादा इदाते, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, दीपा मुधोळ-मुंडे, सुनील वारे, प्रा. डॉ. राजनिश कामत तसेच विवेक विचार मंचचे राज्य कार्यवाह महेश पोहनेरकर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. अनुप्रिता मोरे यांना जाहीर झालेल्या या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा सन्मान बीड जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.

COMMENTS