श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात रात्रीच्या वेळी नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. अभिषेक संजय तळे

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात रात्रीच्या वेळी नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. अभिषेक संजय तळेकर (वय 24, रा. झेंडा चौक, श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांनुसार आरोपीचा शोध सुरू होता. दरम्यान, आरोपी अभिषेक तळेकर हा आपल्या नातेवाईकांच्या घरी आल्याची गोपनीय माहिती पोलीसांना बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलीस तपासानुसार, आरोपी रात्रीच्या वेळी नागरिकांना अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लुटण्याच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद असून त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपासही पोलीसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक जी. बी. यादव, पोलीस कॉन्स्टेबल राऊत, दळवी व कोहक यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली.
या कारवाईमुळे श्रीगोंदा शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी होणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
दरम्यान, आरोपीचा पूर्व इतिहास तपासला असता त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही महिलांना त्रास दिल्याबाबतही माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आरोपीविरोधात कोणाची काही तक्रार अथवा माहिती असल्यास संबंधितांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

COMMENTS