Homeताज्या बातम्या

आळंदीत स्वकुळसाळी ज्ञातीगृहात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आळंदी : आळंदी येथील स्वकुळसाळी ज्ञातीगृहात आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवमहापुराण कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप अत्यंत भक्तिभावाने पार पड

शेवगावमध्ये २९ मे पासून श्री चैतन्य नवनाथ महाराज संगीतमय कथा सोहळा
समजूतदारपणा हीच मोठेपणाची खरी ओळखमहंत उद्धव महाराज मंडलिक ; देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेची सांगता
अंबानगरीत श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन.काल्याचे कीर्तन, दीपोत्सव व महाप्रसादाने होणार सांगता.

आळंदी : आळंदी येथील स्वकुळसाळी ज्ञातीगृहात आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवमहापुराण कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप अत्यंत भक्तिभावाने पार पडला. सप्ताहाची सांगता ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. अधिक मासानिमित्त आयोजित हा धार्मिक सोहळा १ जून ते ८ जून या कालावधीत संपन्न झाला.

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा आरती, विष्णूसहस्रनाम पठण, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा भजन, शिवमहापुराण कथा आणि हरिकीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. शिवमहापुराण कथावाचिका भागवताचार्य सोनाली दीदीजी महाजन यांनी सात दिवस कथा निरूपण केले. त्यांच्या ओघवत्या आणि रसाळ कथेमुळे सभागृह दररोज भाविकांनी गजबजून जात होते. सायंकाळच्या हरिकीर्तन सेवेत विविध कीर्तनकारांनी सहभाग घेत भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले.

समारोपाच्या दिवशी सकाळी आळंदी शहरातून प्रभातफेरी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. इंद्रायणी नदी परिसर, श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर परिसरातून निघालेली दिंडी स्वकुळसाळी ज्ञातीगृहात दाखल झाली. भजन, नामस्मरण आणि टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीत समाजबांधवांसह महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वकुळसाळी ज्ञातीगृहाचे नवनिवर्चित अध्यक्ष अमित सूर्यकांत उजळे, उपाध्यक्ष मनोहर दिवाणे, सचिव देवेन क्षीरसागर, सहसचिव दीपक मारवाडी, खजिनदार प्रवीण जुंधरे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी प्रमुख मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत केले. माजी अध्यक्ष चंद्रकांत हावरे यांनी प्रास्ताविकातून सप्ताह आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सप्ताहादरम्यान शिवपार्वती विवाह सोहळ्याचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. महादेवाची भूमिका सखाराम डगळे यांनी, तर पार्वतीची भूमिका सविता डगळे यांनी साकारली. हा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सप्ताहाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. समाजकार्य आणि दानशूर वृत्तीमुळे परिचित असलेले डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांनी ज्ञातीगृहाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ज्ञातीगृहासाठी लिफ्ट उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली. समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

विश्वस्त, सल्लागार, मार्गदर्शक, भजनी मंडळे, स्वयंसेवक तसेच व्यवस्थापक राजेश त्रिमले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सप्ताह यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महाप्रसाद आणि अन्नदानासाठी अनेक दानशूर व्यक्ती व समाजबांधवांनी उदार सहकार्य केले. आठ दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून समाजातील ऐक्य, आध्यात्मिक जागरूकता आणि सेवाभाव वृद्धिंगत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS