महावितरणच्या केज येथील कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल वाजीदअली सय्यद यांनी अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळात वीज चोरीविरोधात कठोर आणि धडाकेबाज मोहीम र

महावितरणच्या केज येथील कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल वाजीदअली सय्यद यांनी अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळात वीज चोरीविरोधात कठोर आणि धडाकेबाज मोहीम राबवत अवैध वीज वापरणार्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करणार्या या कर्तव्यदक्ष महिला अधिकार्यामुळे केज शहरासह ग्रामीण भागातील वीज व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
शितल सय्यद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वीज चोरी करणार्यांविरोधात कोणताही राजकीय दबाव किंवा शिफारस न मानता थेट दंडात्मक कारवायांचा सपाटा लावला. त्यामुळे अनेक अवैध वीज जोडण्या उघडकीस आल्या असून महावितरणच्या महसुलातही वाढ झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या या कठोर कारवाईमुळे काही धनदांडगे, स्थानिक पुढारी आणि हितसंबंधी गट नाराज झाल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करण्यात येत असून बदलीसाठी राजकीय दबाव आणला जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इतकेच नव्हे तर महावितरणमधील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांकडूनही त्यांना छुपा विरोध होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र या सर्व घडामोडींना न जुमानता सय्यद यांनी आपले काम पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवले आहे. वीज चोरीविरोधातील कारवाईसोबतच त्यांनी अनेक तांत्रिक अडचणी दूर करून शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांना अधिक चांगली वीज सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. कोणत्याही वेळी ग्राहकांचा फोन आला तरी त्यांच्या समस्येचे तातडीने निराकरण करण्यासाठी त्या तत्पर असतात, अशी भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेमुळे केजमधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकार्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत अनेक नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. आजपर्यंत मी कोणाकडूनही एक रुपयाची लाच घेतलेली नाही. महावितरणकडून मिळणार्या वेतनावर समाधानी राहून प्रामाणिक सेवा देणे हीच माझी ओळख आहे. बदलीची भीती मला नाही. जिथे जाईन तिथे प्रामाणिकपणेच काम करेन, अशी ठाम भूमिका शितल सय्यद यांनी व्यक्त केली. त्यांच्या या निर्भीड, पारदर्शक आणि लाचमुक्त कारभारामुळे केज तालुक्यातील अनेक नागरिकांनी त्यांना ‘लेडी सिंघम’ अशी उपाधी देत पाठिंबा जाहीर केला आहे.
कौतुकही स्वीकारते, टीकाही स्वीकारते!
ज्यांचे तांत्रिक काम तात्काळ पूर्ण होते ते ग्राहक आनंदाने धन्यवाद देतात. काही वेळा तांत्रिक कारणांमुळे एखाद्याचे काम लगेच होऊ शकत नाही, तेव्हा नाराजीही व्यक्त होते. मात्र मी जनतेची सेवक असल्याने कौतुक आणि टीका या दोन्ही गोष्टी सहजतेने स्वीकारून माझे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत राहीन.
– शितल सय्यद, कनिष्ठ अभियंता, महावितरण, केज

COMMENTS