राहाता : तालुक्यातील शिर्डी, राहाता व पुणतांबा मंडळांतील शेतकऱ्यांना २०२५ च्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिक विम्याचा परताव

राहाता : तालुक्यातील शिर्डी, राहाता व पुणतांबा मंडळांतील शेतकऱ्यांना २०२५ च्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिक विम्याचा परतावा अद्याप मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही मंडळांना परतावा मिळूनही या तीन महत्त्वाच्या मंडळांतील हजारो शेतकरी वंचित राहिल्याने दुजाभाव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, लोणी व अस्तगाव येथील शेतकऱ्यांना पिक विम्याचा परतावा मिळाला आहे. मात्र शिर्डी, राहाता व पुणतांबा या मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप विम्याची रक्कम जमा झालेली नाही. सध्याच्या घडीला कांदा, सोयाबीन, मका यांसारख्या पिकांना समाधानकारक भाव नसताना शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पिक विम्याची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी मागणी जळगाव येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र जगन्नाथ चौधरी यांनी केली आहे.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, अस्तगाव, बाभळेश्वर व लोणी मंडळांतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२५ मध्ये भरलेल्या पिक विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यानुसार बाभळेश्वर मंडळात हेक्टरी १७,५०० रुपये, तर लोणी व अस्तगाव मंडळात हेक्टरी १३,६०० रुपये परतावा मंजूर करण्यात आला असून, सुमारे ६,५९७ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.
मात्र दुसरीकडे पुणतांबा मंडळातील ४,५६०, राहाता मंडळातील २,५९० आणि शिर्डी मंडळातील १,२३७ अशा एकूण १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत असून, कृषी विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, शिर्डी, राहाता व पुणतांबा मंडळांतील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२५ अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, संपतराव चौधरी, मच्छिंद्र चौधरी, आण्णासाहेब चौधरी, भागवतराव चौधरी, सुरेश चौधरी, बाजीराव चौधरी, पंढरीनाथ चौधरी, बाळासाहेब वाघ, दत्तात्रय चौधरी, रंगनाथ चौधरी, गोपीनाथ चव्हाण, शरद चौधरी, शिवाजी चौधरी, सचिन चौधरी, भास्कर चौधरी आदींसह शेतकरी वर्गाने केली आहे.

COMMENTS