जामखेड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढती वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, बेशिस्त पार्किंगमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. या पार

जामखेड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढती वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, बेशिस्त पार्किंगमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत विशेष मोहीम राबविली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिला आहे.
शहरातील सिमेंट रस्त्यावर आडवेतिडवे दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे वाहनधारकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
दि. ४ मे रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर कारवाई करत रस्त्यावर उभी केलेली वाहने हटविली. बीड रोड कॉर्नर ते बस स्थानक या परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे काही काळ वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसून आले.
यावेळी चौधरी यांनी स्पष्ट केले की, सिमेंट रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत वाहन पार्किंग करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच आवश्यक असल्यास वाहने जप्त करण्यात येतील. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कारवाईचा एकदिवसीय शो नको
बीड रोड कॉर्नर ते बस स्थानकापर्यंत पोलिस पथकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावरच उभे केलेले वाहने हटविले. बऱ्यापैकी रस्ते मोकळे झाले. पोलिसांकडून होणारी कारवाई पाहून नागरिकांना काही काळ बरं वाटलं. पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेमुळे रस्ते काही प्रमाणात मोकळे झाले असले, तरी ही कारवाई केवळ एकदिवसीय राहू नये, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. सातत्याने कारवाई केल्यास बेशिस्त वाहनधारकांमध्ये शिस्त निर्माण होऊन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

COMMENTS