ठाणे : डोंबिवली परिसरात दहशत निर्माण करणारा आणि समाजमाध्यमांवर स्वतःची प्रतिमा उभारणारा कुख्यात गुंड सुरेंद्र पांडुरंग पाटील याच्यावर ठाणे गुन्हे

ठाणे : डोंबिवली परिसरात दहशत निर्माण करणारा आणि समाजमाध्यमांवर स्वतःची प्रतिमा उभारणारा कुख्यात गुंड सुरेंद्र पांडुरंग पाटील याच्यावर ठाणे गुन्हे शाखेने मध्यरात्री धडक कारवाई करत त्याच्या बंगल्यावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे दहा लाख रुपये किमतीचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, गुन्हेगारी जगतात यामुळे खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेला पाटील पुन्हा बेकायदा हालचालींमध्ये गुंतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. जामिनानंतर दोन आठवडेही पूर्ण न होता तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दावडी येथील पाटीलच्या आलिशान बंगल्यावर छापा टाकण्यात आला. सुरुवातीला घराची तपासणी करताना सर्व काही सामान्य वाटत होते; मात्र एका कपाटाबाबत पोलिसांना संशय आला. पुढील झडतीत त्या कपाटात अत्यंत कौशल्याने तयार केलेला गुप्त कप्पा आढळून आला. या कप्प्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रे लपवून ठेवलेली असल्याचे उघड झाले. या कारवाईत पाच देशी बनावटीची पिस्तुले व रिव्हॉल्व्हर, दोन एअर गन, जिवंत काडतुसे तसेच 167 एअर गनच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. काही शस्त्रांवर परदेशी निर्मितीची चिन्हे कोरलेली असल्याचेही निदर्शनास आले. एवढ्या प्रमाणात जिवंत दारूगोळा आढळल्यामुळे हा साठा केवळ प्रदर्शनासाठी नसून तो वापरासाठी सज्ज ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शस्त्रसाठ्याचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी केला जाणार होता, याचा तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हेगारांना पुरवठा करण्यासाठी हा साठा जमवण्यात आला होता का, अथवा मोठ्या गुन्ह्याची तयारी सुरू होती का, याचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS