मुंबई : केंद्रामध्ये भाजप सध्या मित्रपक्षाच्या जोरावर सत्तेत असतांना महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदार शिंदे य

मुंबई : केंद्रामध्ये भाजप सध्या मित्रपक्षाच्या जोरावर सत्तेत असतांना महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदार शिंदे यांची शिवसेना गळाला लावत असून, त्यादृष्टीने राज्यात ऑपरेशन टायगर राबवण्यात येणार होते. मात्र या ऑपरेशन टायगरला ब्रेक लागला असल्याचे समजते, कारण असे झाल्यास शिंदे यांची शिवसेना प्रबळ झाली असती, अशी चर्चा रंगू लागली आहे.
यासंदर्भात सविस्रत माहिती अशी की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेला अचानक ब्रेक लागल्याची माहिती समोर येत असून, या निर्णयामागे केंद्रातील सत्ताधारी नेतृत्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विरोधी गटातील खासदारांना आपल्या बाजूला वळवण्याच्या हालचालींना आता नवे वळण मिळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे यांनी ‘ऑपरेशन तुतारी’च्या माध्यमातून शरद पवार गटातील तसेच उद्धव ठाकरे गटातील मिळून सुमारे बारा खासदारांना आपल्या गटात आणण्याची रणनीती आखली होती. सध्या शिंदे गटाकडे सात खासदार आहेत. प्रस्तावित हालचाल यशस्वी झाली असती, तर ही संख्या उन्नीसपर्यंत पोहोचली असती आणि राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकला असता. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला सत्ताधारी आघाडीतील वरिष्ठ पातळीवरून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याची चर्चा आहे. उलट, काही खासदारांना थेट शिंदे गटात न आणता इतर सहयोगी पक्षांच्या माध्यमातून सत्ताधारी आघाडीत सामील करण्याचा पर्याय पुढे करण्यात आल्याचे बोलले जाते. यामुळे शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेचा वेग कमी झाल्याचे दिसून येत आहे. अलीकडे दिल्लीतील भेटीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची भेट न झाल्याची माहितीही समोर आली आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, सत्ताधारी आघाडीत अंतर्गत समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
संख्याबळ वाढवण्यामागील राजकीय गणित
राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी आघाडी मजबूत असल्याने काही खासदार भविष्यातील राजकीय स्थैर्याचा विचार करून सत्तेकडे झुकत असल्याचे बोलले जाते. विकासकामांसाठी निधी मिळवणे, मतदारसंघात प्रकल्प राबवणे आणि प्रशासनिक सहकार्य मिळवणे या दृष्टीने सत्ताधार्यांशी जवळीक फायदेशीर ठरते, ही भावना काही लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झाल्याचेही समजते. तसेच, पक्षनिष्ठेपेक्षा सत्तेचा लाभ अधिक महत्त्वाचा ठरतो, अशी व्यावहारिक भूमिका काही खासदार स्वीकारत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता.
शिंदेंच्या ताकदवाढीला केंद्रातून ब्रेक
या संभाव्य संख्यावाढीच्या आधारावर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अधिक जागांवर दावा करण्याची रणनीती शिंदे गटाने आखल्याचे मानले जात होते. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे ही योजना पुढे कशी राबवली जाईल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. सत्ताधारी नेतृत्वाकडून आलेल्या या संकेतांमुळे ‘ऑपरेशन टायगर’ची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गट आपली रणनीती बदलून टप्प्याटप्प्याने राजकीय विस्तार साधणार का, की पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS