Homeताज्या बातम्या

शासकीय यंत्रणा अलर्ट मोड’वर ठेवा : मुख्यमंत्री फडणवीसअत्यावश्यक कामाशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय यंत्रणांना चोवीस तास सतर्क राहण्याचे

ठाण्यात मुसळधार पावसाने दाणादाण! रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप, ड्रेनेज व्यवस्थेचे उडाले बारा!
पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; वाहतूक ठप्प
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवारमध्ये भूस्खलन, रस्तेही बंद


मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय यंत्रणांना चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून दुपारी समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मदतकार्य सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच इतर किनारी भागात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यातच समुद्रातील भरतीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पूर्ण तयारीत ठेवण्यात आली आहेत. पूर किंवा इतर आपत्ती उद्भवल्यास मदतकार्य तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनाही महत्त्वाचे आवाहन करत, पुढील दोन दिवस अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे सांगितले. विशेषतः सखल भाग, नदीकाठ, समुद्रकिनारा आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी समन्वय साधून दरडीचा मलबा आणि अन्य अडथळे तातडीने हटविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी अचानक दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने तेथे यंत्रणा सतत सज्ज ठेवून वाहतूक खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. डोंगर उतारांवरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यकतेनुसार यंत्रसामग्री आणि बचाव पथके तैनात ठेवावीत, अशा सूचनाही संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या.
नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा
अरबी समुद्रावरील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्यात, विशेषतः त्र्यंबकेश्‍वर आणि परिसरात, ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. काही भागांत सुमारे 300 मिलीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने सखल भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, पाणी साचू नये यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित ठेवाव्यात आणि जीवितहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे निर्देश त्यांनी दिले. त्र्यंबकेश्‍वर परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरडी कोसळण्याचा धोका असलेले रस्ते, पूरस्थिती निर्माण होऊ शकणारे भाग आणि इतर धोकादायक ठिकाणांची माहिती पर्यटकांना देऊन आवश्यक असल्यास त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे प्रशासनाला सांगण्यात आले.

COMMENTS