कोपरगाव: मतदारसंघात चार हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा आमदार आशुतोष काळे यांचा दावा असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यांची झालेली दुरवस्था वेगळे

कोपरगाव: मतदारसंघात चार हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा आमदार आशुतोष काळे यांचा दावा असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यांची झालेली दुरवस्था वेगळेच चित्र दाखवत आहे. टाकळी-ब्राम्हणगाव रस्त्याची काही काळातच झालेली दयनीय अवस्था ही कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे विकासकामांच्या दाव्यांचा फज्जा उडाल्याची टीका अशोक बनकर यांनी केली. बनकर यांनी केलेल्या आरोपानुसार, टाकळी-ब्राम्हणगाव मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यावरील डांबर उखडून दगड उघडे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, अपघाताचा धोका वाढला आहे, असा दावा बनकर यांनी केला. एकीकडे चार हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा गवगवा केला जात असताना दुसरीकडे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. टाकळी-ब्राम्हणगाव रस्ता हा त्याचे एक उदाहरण असून, मतदारसंघातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही गंभीर आहे. त्यामुळे मोठमोठ्या घोषणांपेक्षा दर्जेदार आणि टिकाऊ विकासकामांची गरज असल्याचे बनकर यांनी म्हटले. मागील पंचवार्षिक कार्यकाळासह सध्याच्या कार्यकाळातही सर्वसामान्यांना जाणवेल असा विकास दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते, पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचेही त्यांनी सांगितले. चार हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा दावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष झालेल्या कामांची गुणवत्ता आणि त्याचा जनतेला झालेला लाभ याचा हिशेब देण्याची वेळ आली आहे. टाकळी-ब्राम्हणगावसह मतदारसंघातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून कामाच्या दर्जाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी बनकर यांनी केली. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS