देवळाली प्रवरा: श्री. महर्षी वेदव्यास भजनी मंडळ, माहेगांव यांच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, रोटरी क्लब ऑफ राहुर

देवळाली प्रवरा: श्री. महर्षी वेदव्यास भजनी मंडळ, माहेगांव यांच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, रोटरी क्लब ऑफ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पंचक्रोशीतील युवक, ग्रामस्थ व मंडळाच्या सदस्यांसह एकूण १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी ह.भ.प. नामदेवजी महाराज जाधव (शास्त्री), ग्रामविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा तोडमल, सरपंच गणेश कवडे, कारखाना संचालक डॉ. बा. बा. तनपुरे, ज्ञानेश्वर पवार, प्रदीप तनपुरे, हसन शेख, हिरामण गुंड, निवृत्ती देठे, मधुकर पवार, गोरख पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी “रक्तदान हेच जीवनदान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करावे,” असे आवाहन केले. संस्थेची नोंदणी झाल्यानंतर महर्षी वेदव्यास भजनी मंडळाने आयोजित केलेला हा पहिलाच समाजोपयोगी उपक्रम असून, त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक लक्ष्मण देठे यांनी केले. सूत्रसंचालन सचिव अरुण जाधव यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर भूमकर यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ राहुरीचे पदाधिकारी, रक्तपेढीचे कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ तसेच महर्षी वेदव्यास भजनी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS