वडवणी : दुधाचा दर ठरवण्याचा अधिकार आतापर्यंत सरकार, दूध संघ आणि डेअरी चालकांकडे होता. मात्र वडवणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांनी हा पायंडा

वडवणी : दुधाचा दर ठरवण्याचा अधिकार आतापर्यंत सरकार, दूध संघ आणि डेअरी चालकांकडे होता. मात्र वडवणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांनी हा पायंडा मोडीत काढत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकर्यांनी एकत्र येत स्वतःच्या दुधाचा भाव स्वतः ठरवला असून 19 जून 2026 पासून वडवणी तालुक्यात दुधाला किमान 80 रुपये प्रति लिटर दर लागू करण्यात आला आहे.
रेणुका माता मंगल कार्यालय, वडवणी येथे गुरुवारी (दि. 18 जून) झालेल्या बैठकीत 20 हून अधिक गावांतील 300 पेक्षा अधिक दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तुकाराम मुंडे यांनी राज्यातील दूध भेसळीविरोधात उघड केलेल्या कारवाईमुळे शेतकर्यांमध्ये जागृती निर्माण झाली असून, त्यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकर्यांनी सांगितले. शेतकर्यांच्या मते, भेसळयुक्त दूध आणि बनावट दूधजन्य पदार्थांमुळे चांगल्या प्रतीच्या दुधाला योग्य भाव मिळत नव्हता. भेसळीच्या दुधामुळे खर्या शेतकर्यांच्या मेहनतीला किंमत मिळत नव्हती. आता शुद्ध दुधाला योग्य दर मिळायला हवा, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. पशुखाद्य, वैरण, औषधे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे दूध उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी दरामुळे अनेक दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे सरकार दरवाढ करेल याची वाट पाहण्यापेक्षा आपणच आपल्या उत्पादनाला योग्य भाव द्यायचा, असा निर्णय शेतकर्यांनी घेतला. बैठकीतील निर्णयानुसार 19 जूनपासून वडवणी तालुक्यातील दूध संकलन केंद्रांवर 80 रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध संकलन केंद्रांवर दराबाबत फलक लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती दूध विक्रीसाठीही 80 रुपये प्रति लिटर दर निश्चित करण्यात आला आहे. शेतकर्यांनी ग्राहकांना शुद्ध आणि भेसळमुक्त दूध देण्याची हमी दिली आहे. ग्राहकांनीही शेतकर्यांना योग्य भाव मिळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून, दूध शुद्ध असणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. आमची अंतिम मागणी दुधाला 100 रुपये प्रति लिटर भाव मिळण्याची आहे. सध्या ग्राहकांचा विचार करून 80 रुपयांचा दर निश्चित केला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करू. 100 रुपयांच्या भावासाठीचा लढा पुढेही सुरू राहील, असा निर्धार दूध उत्पादकांनी व्यक्त केला. शेतकर्यांनी स्वतःच्या उत्पादनाचा भाव स्वतः ठरवून त्याची अंमलबजावणी करण्याचा हा प्रयोग वडवणीतून सुरू झाला आहे. सरकारकडे भाव मागण्याऐवजी आपण संघटित होऊन स्वतःचा भाव ठरवायचा, असा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. वडवणीतील हा निर्णय राज्यातील इतर दूध उत्पादक शेतकर्यांसाठी प्रेरणादायी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS