Homeताज्या बातम्या

बंदी कागदावरच; शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ!

राज्यात गुटखाबंदी लागू होऊन अनेक वर्षे उलटली असली, तरी नांदेडसह अनेक शहरांमध्ये गुटख्याची विक्री आजही सर्रास सुरू असल्याचे वास्तव समोर येत आहे. क

सोनईत सुगंधी तंबाखूचा साठा जप्त
शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त विक्रेत्यांत खळबळ
सावधान! तुम्ही खाताय तो नाश्ता सुरक्षित आहे का? चक्क नाल्याच्या घाण पाण्यापासून बनतोय नाश्ता



राज्यात गुटखाबंदी लागू होऊन अनेक वर्षे उलटली असली, तरी नांदेडसह अनेक शहरांमध्ये गुटख्याची विक्री आजही सर्रास सुरू असल्याचे वास्तव समोर येत आहे. कायद्याचा धाक कमी पडत असल्याने गुटखा आता उघडपणे नव्हे, तर मागणी तसा पुरवठा या पद्धतीने चढ्या दराने विकला जात असून ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे.
पूर्वी दहा रुपयांना सहज उपलब्ध होणारी गुटख्याची पुडी आता वीस ते तीस रुपयांपर्यंत विकली जात असल्याची चर्चा आहे. काही ब्रँड तर यापेक्षाही अधिक दराने विकले जात असल्याचे ग्राहक सांगतात. दुकानदारांकडून उघडपणे विक्री न करता, विश्वासू ग्राहकांना इशारा मिळताच गुप्त ठिकाणाहून गुटखा आणून दिला जातो. त्यामुळे बंदी असूनही हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक पानटपर्‍या, किराणा दुकाने आणि काही ठराविक ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या कारवाईची चाहूल लागताच माल दुसर्‍या ठिकाणी हलविणे, लहान-लहान साठे ठेवणे आणि मध्यस्थांच्या माध्यमातून पुरवठा करणे अशा नव्या युक्त्या वापरल्या जात आहेत. गुटख्याच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत असले, तरी व्यसनाधीन व्यक्ती पर्याय नसल्याने चढ्या दरानेही गुटखा खरेदी करत आहेत. याच परिस्थितीचा फायदा काही विक्रेते आणि पुरवठादार घेत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यावर बंदी असतानाही त्याची उपलब्धता कमी झालेली नाही. उलट गुप्त विक्रीमुळे काळाबाजाराला खतपाणी मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. युवक आणि अल्पवयीन मुलांपर्यंतही गुटखा सहज पोहोचत असल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांच्या मते, अधूनमधून होणार्‍या कारवायांपेक्षा सातत्यपूर्ण धाडी, पुरवठा साखळीवर कठोर कारवाई आणि सीमावर्ती भागातून होणारी तस्करी रोखल्याशिवाय गुटख्याचा अवैध व्यवसाय थांबणे कठीण आहे. गुटखाबंदीचा कायदा प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने व्यापक मोहीम हाती घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

COMMENTS