अहिल्यानगर / प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाची मुदत संपुष्टात आली असून 16 व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी अटी व शर्ती जाहीर करण्या

अहिल्यानगर / प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाची मुदत संपुष्टात आली असून 16 व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी अटी व शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्याला मिळणार्या निधीत 10 टक्के वाढ होणार आहे. मात्र, पहिल्या वर्षी मिळालेल्या हप्त्यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च झाला. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नात वाढ झाली तरच पुढील हप्ता मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना उत्पन्नात वाढ करण्याचे मार्ग शोधावे लागणार आहेत. कामगिरीच्या प्रमाणात या संस्थांना प्रोत्साहनपर अनुदानही मिळणार आहे.
जिल्ह्यात 1328 ग्रामपंचायती, 14 पंचायत समिती व एक जिल्हा परिषद आहे. पूर्वीप्रमाणे 16 व्या वित्त आयोगातही अनुक्रमे 80 टक्के व प्रत्येकी 10 टक्के असा निधी वितरित केला जाणार आहे. मात्र, लोकसंख्येबरोबरच आता क्षेत्रफळाचाही विचार अनुदान वितरणासाठी केला जाणार आहे. मात्र लोकनियुक्त प्रतिनिधी अस्तित्वात असेल, ‘आपला गाव-आपला विकास आराखडा’ संकेतस्थळावर सादर केला असेल, लेखापरीक्षण झालेले असेल तरच निधी वितरित केला जाणार आहे. 15 व्या वित्त आयोगाची मुदत सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी होती. आता 16 व्या वित्त आयोगाची मुदत सन 2026-27 ते सन 2030-31 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
पंधराव्या वित्त आयोगात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला होता. आता 16 व्या वित्त आयोगात संस्थांच्या स्व: उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेला स्वतःचे उत्पन्नात 2.5 टक्के, पंचायत समितीला कार्यक्षेत्रातील 75 टक्के ग्रामपंचायतींनी व ग्रामपंचायतींनी प्रतिमाणशी 1200 रुपये दरमहा उत्पन्न वाढवले तरच पुढील अनुदान मिळणार आहे. पंचायत राज मधील त्रिस्तरीय व्यवस्थेतील या संस्थांचा निधी परस्परांच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे. अबंधित अनुदानाच्या कामात अधिक लवचिकता व कार्यक्षमतेवर आधारित वितरण केले जाणार आहे. रस्त्यांसाठी केवळ 20 टक्के निधी खर्च करता येणार आहे तर उर्वरित निधी गावाच्या गरजेनुसार ग्रामसभेत निर्णय होऊन खर्च करावा लागणार आहे.
पहिल्या वर्षी 843 ग्रामपंचायतींना दणका
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी असेल तरच निधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेसह 843 ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहे. 16 व्या वित्त आयोगाचा पहिल्या हप्त्याचा 80 टक्के म्हणजे 199 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. मात्र, त्याचे वितरण झालेले नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे जिल्हा परिषद व 843 ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षीचा निधी मिळणार नाही.

COMMENTS