Homeताज्या बातम्यासंपादकीय

गुजरातेत विक्रम तर हिमाचलमध्ये पराभव ! 

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचे कल आणि निकाल दोन्ही राज्यांच्या सत्ता स्थापनेसाठी कोणता पक्ष येतो आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्यातच जमा आहे

खबरदार! ५० टक्केला हात लावला तर !
गेम चेंजर महिला नेत्या !
समाजमनावर झालेले संस्कार हेच आत्महत्येचे कारण!

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचे कल आणि निकाल दोन्ही राज्यांच्या सत्ता स्थापनेसाठी कोणता पक्ष येतो आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्यातच जमा आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुका जिंकून भारतीय जनता पक्षाने यापूर्वी सलग सात वेळा पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकणाऱ्या माकपची बरोबरी केली आहे; आणि देशात पश्चिम बंगाल नंतर प्रथमच कुठल्यातरी एखाद्या पक्षाने सलग सात वेळा विधानसभा जिंकण्याचा विक्रम बरोबरीने केला आहे. अर्थात गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाला शंभरच्या आतच रोखण्यात काँग्रेसने करामत केली होती. परंतु, यावेळी भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा ही ५०% पेक्षाही अधिकने व्यापून आपली बहुमताची सत्ता अधिक मजबूत केली आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या या सत्तेचं नेमकं गमक काय, असा प्रश्न विचारला तर साहजिकच आहे, कोणत्याही राज्याची जनता ते राज्य जर विक्रमाच्या जवळपास असेल आणि तो विक्रम बरोबरी करण्यास राज्याच्या जनतेचे सहकार्य हवं असेल तर, अशावेळी जनता निश्चितपणे आपल्या परीने तो प्रयत्न यशस्वी करीत असल्याचे हे उदाहरण आहे! त्यामुळे अनेक प्रश्न असतानाही गुजरात निवडणुकांमध्ये भाजपने केलेला स्वीप हा केवळ जनतेने त्यांना विक्रमासाठी केलेले सहकार्य आहे, असाच अर्थ यातून स्पष्ट होतो आहे. तर दुसऱ्या बाजूला हिमाचल प्रदेश सारख्या निसर्गरम्य राज्यात परंतु मतदार संघ अतिशय विरळ आणि दुर्गम असणाऱ्या या राज्यात ६८ जागांच्या विधानसभेत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाला ३५ जागा मिळवणे आवश्यक असताना भाजपला मागे टाकत काँग्रेसने जवळपास ३९ जागांवर आपले यश निश्चित केले आहे. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीत अवघा ०.९०% म्हणजे एक टक्क्यांपेक्षाही कमी फरक आहे. ज्यामध्ये भाजपला ४२ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली, तर काँग्रेसला ४३ टक्क्यांपेक्षा अधिकची मते मिळाली. पण या एक टक्क्याच्या फरकाने काँग्रेसने भाजपला १३ जागांनी मागे टाकले. म्हणजे एकूण बहुमताची आकडेवारी पाहता ६८ जागांपैकी काँग्रेसला जवळपास ३९ जागांवर विजय निश्चित आहे. हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस भाजपा नंतर त्या खालोखालची मते अपक्षांना म्हणजे ११ टक्के मते अपक्षांना या राज्यात गेली आहेत. हिमाचल प्रदेश राज्याचे वैशिष्ट्य असे की, या राज्याच्या एकूण लोकसंख्येत शेड्युल कास्ट ची लोकसंख्या सर्वाधिक आहे. देशातील पश्चिम बंगाल नंतर हिमाचल प्रदेश हेच राज्य असे आहे की, ज्यामध्ये शेड्युल कास्ट ची लोकसंख्या देशात दुसऱ्या क्रमांकाची आहे; म्हणजे ती जवळपास २७% आहे. गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाला ५३ टक्क्यांपेक्षा अधिक मत मिळाली. तर, काँग्रेसला या राज्यात २७% पेक्षा अधिक मते मिळाली आहेत. सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आम आदमी पक्षाला या राज्यात जवळपास १३% म्हणजे १२.९०% इतकी मतं मिळाली आहेत. पाच जागा घेऊन आम आदमी पक्ष गुजरातच्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्ष बनण्यास जवळपास सज्ज झाला आहे. कालच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल ही जाहीर झाले दिल्ली महानगरपालिकेच्या तीन महापालिका एकत्र येऊन प्रथमच एकच दिल्ली महानगरपालिका होऊन तिच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने पंधरा वर्षाची भारतीय जनता पक्षाची सत्ता हटवून, बहुमताने सत्ता आपल्याकडे काबीज केली. मात्र या निवडणुकीनंतर आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गुजरात निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन केले. तसे आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये भाजपला रोखल्याबद्दल आपले अभिनंदन केले. परंतु, हे अभिनंदन करतानाच ते हे बोलायलाही विसरले नाही की, या दोन्ही पक्षांनी या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका ठरवून जिंकलेल्या आहेत. दिल्ली आपने घ्यावी आणि गुजरात भाजपला सोडावे, असा समझौता या दोन्ही पक्षात झाला असावा,  अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त करून या निकालांवर काहीसे टीकेचे ओरखडे ओढले आहेत.

COMMENTS