नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामाला प्रभारी कार्यकारी अभियंता दिली

नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामाला प्रभारी कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर यांच्या दिरंगाईमुळे मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. राज्य शासनाने या स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी तांत्रिक बाबींतील विलंबामुळे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकलेला नाही. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पाठपुराव्यामुळे या स्मारकासाठी निधी मंजूर झाला. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला. मात्र, कामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, डोमचे डिझाइन आणि तांत्रिक मंजुरी वेळेत न दिल्याने काम रखडल्याचा आरोप होत आहे. महापौर कविता मुळे यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, ती मुदत संपूनही काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली, तरी या कालावधीतही स्मारक पूर्ण होण्याची शक्यता कमी असून प्रकल्प ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कंत्राटदाराने जागा ताब्यात देणे, डोमचे डिझाइन आणि इतर तांत्रिक बाबी उपलब्ध करून देण्यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यावर वेळेत कार्यवाही न झाल्याने कामात अडथळे निर्माण झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे या विलंबासाठी प्रभारी कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर यांनाच जबाबदार धरले जात असून, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडून या प्रकरणी दप्तरदिरंगाई कायद्यानुसार कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS