पुणे : शहर आणि ग्रामीण भागात अमली पदार्थांचा विळखा अधिकच घट्ट होत असल्याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. ऑनलाईन डिलिव्हरी पचा वापर करून

पुणे : शहर आणि ग्रामीण भागात अमली पदार्थांचा विळखा अधिकच घट्ट होत असल्याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. ऑनलाईन डिलिव्हरी पचा वापर करून ड्रग्जची ने-आण आणि विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, न्हावरा फाटा ते बाबूरावनगर मार्गावरील एका ठिकाणी काही युवक अमली पदार्थांची देवाणघेवाण करणार असल्याचे समजले. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर संशयित हालचाली करणार्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विशाल मारुती मोरे (वय 20), प्रतीक संतोष लांबे (वय 25) आणि मिथुन विजयपाल सिंग (वय 26, तिघेही शिरूर येथील) यांचा समावेश आहे. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून सुमारे 47.60 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. याची बाजारमूल्य सुमारे 2 लाख 15 हजार रुपये आहे. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली दोन चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली असून, एकूण 29 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
तपासादरम्यान समोर आलेली बाब अधिक चिंताजनक आहे. आरोपी ऑनलाईन डिलिव्हरी पच्या माध्यमातून ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या काही काळात त्यांनी अशा पद्धतीने तीन ते चार वेळा अमली पदार्थांची वाहतूक केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. डिलिव्हरी सेवेत काम करणार्या कर्मचार्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहोचवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या साखळीत संबंधित कंपनीतील कर्मचारी थेट सहभागी आहेत का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. आतापर्यंत या टोळीने 25 ते 30 जणांना अमली पदार्थांची विक्री केल्याचे समोर आले असून, ग्रामीण भागातील तरुणाई आणि अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. ऑनलाईन माध्यमांमुळे ड्रग्जची सुलभ उपलब्धता वाढत असल्याने कायदा अंमलबजावणी यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS