बीड : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवर जागोजागी पडलेल्या मोठ्या भेगांमुळे दुचाकी वाहनधारकांसाठी रस्ते धोकादायक ठरत असून, या भेगांमध्य


बीड : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवर जागोजागी पडलेल्या मोठ्या भेगांमुळे दुचाकी वाहनधारकांसाठी रस्ते धोकादायक ठरत असून, या भेगांमध्ये चाके अडकून अनेक अपघात घडल्याने मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमाण वाढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.
खामगाव-पंढरपूर, अहमदपूर-अहिल्यानगर आणि पैठण-पंढरपूर यांसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांवर मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या असून, या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे त्यांनी सांगितले. काही अपघातांमध्ये जीवितहानी झाली असून अनेक नागरिकांना कायमचे अपंगत्व आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. रस्त्यांच्या कडेने वाढलेली काटेरी झुडपे, तसेच काही ठिकाणी दुभाजकाजवळ साचलेली माती यामुळे वाहनचालकांना अतिरिक्त अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचेही ते म्हणाले. नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार तक्रारी, निवेदने आणि आंदोलने करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएससीआरडीसी आणि जिल्हा प्रशासनाकडून ठोस दुरुस्ती होत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अपघातांमध्ये 33 टक्के घट झाल्याचा दावा करण्यात आला असून, बीड जिल्ह्याने रस्ते सुरक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था गंभीर असताना अशा आकडेवारीने प्रशासन स्वतःची पाठ थोपटत असल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉ. ढवळे यांनी व्यक्त केली.
कंत्राटदारांकडून आदेशांकडे दुर्लक्षाचा आरोप
रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांकडे कंत्राटदारांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावरील लिंबागणेश परिसरातील अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक बसविण्याबाबत 6 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश दिले होते. मात्र सहा महिने उलटूनही अद्याप अंमलबजावणी न झाल्याने आदेशांना ‘केराची टोपली’ दाखवली जात असल्याची टीका होत आहे. या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासन आणि कंत्राटदारांवर नियंत्रण नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

COMMENTS