Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्धापूरजवळ भरधाव कारचा कहर; आखाड्यात घुसून शेतमजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अर्धापूर : तामसा ते अर्धापूर मार्गावर  सोमवारी दि.21  रोजी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगातील कारवरील चालकाचा ताब

भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धीवर भीषण अपघातात मृत्यू!
कंटेनरची तीन घरांना धडक; माणिकदौण्डी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही
भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर कारला जोरदार धडक, दीड वर्षाचा चिमुकला सुखरूप!

अर्धापूर : तामसा ते अर्धापूर मार्गावर  सोमवारी दि.21  रोजी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगातील कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या आखाड्यात घुसले आणि तेथे विश्रांती घेत बसलेल्या एका निष्पाप शेतमजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेत गंभीर जखमी झालेल्या मंगलबाई साहेबराव शिंदे (वय 38, रा. लोण ता. अर्धापूर) यांचा नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगलबाई शिंदे या रोजप्रमाणे शेतमजुरी करून दुपारच्या सुमारास थकवा दूर करण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या आखाड्यात विसाव्यासाठी बसल्या होत्या. उन्हाच्या कडाक्यामुळे काही वेळ विश्रांती घेण्यासाठी त्या तेथे थांबल्या होत्या. दरम्यान, तामसाहून अर्धापूरकडे येणारी एक कार अत्यंत वेगात येत होती. चालकाचा वेगावर ताबा सुटल्याने कार अचानक रस्त्याबाहेर जाऊन थेट आखाड्याकडे झेपावली. क्षणाचाही अवधी न देता या भरधाव कारने मंगलबाईंना जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की मंगलबाई काही अंतर फरफटत गेल्या आणि गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या अपघातात आखाड्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी तत्काळ पुढाकार घेत जखमी मंगलबाईंना स्वतःच्या वाहनातून नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, मात्र त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. काही तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर सायंकाळच्या सुमारास उपचारादरम्यान मंगलबाई यांची प्राणज्योत मालवली. एका कष्टकरी, कुटुंबाचा आधार असलेल्या महिलेचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे रस्त्यावरील बेफाम वेग आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच वेगमर्यादांचे काटेकोर पालन व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. रस्त्यावरील अनियंत्रित वेग निष्पापांचा बळी घेत आहे. आज एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे अत्यावश्यक आहे, अशी भावना स्थानिक नागरिक सुनील शिंदे यांनी व्यक्त केली.

COMMENTS