बेलापूर: येथील जुन्या बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे पत्रकारांनी वारंवार लक्ष वेधल्यानंतर श्रीरामपूर एसटी आगाराचे व्यवस्थापक अनिल बेहरे यांनी पत्रकारा

बेलापूर: येथील जुन्या बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे पत्रकारांनी वारंवार लक्ष वेधल्यानंतर श्रीरामपूर एसटी आगाराचे व्यवस्थापक अनिल बेहरे यांनी पत्रकारांसमवेत बसस्थानकाची पाहणी केली. जुने बसस्थानक पाडून त्या जागी कॅन्टीन, स्वच्छतागृह आणि अन्य सुविधांसह नवीन बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आल्याची माहिती बेहरे यांनी दिली. बेलापूर येथील बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत पत्रकारांनी वेळोवेळी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार श्रीरामपूर आगाराचे व्यवस्थापक बेहरे आणि स्थापत्य विभागाचे राकेश सोनवणे यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, देविदास देसाई, दिलीप दायमा आदींसमवेत बसस्थानकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान बसस्थानकाच्या भिंतीला पडलेले भगदाड तात्पुरते बुजविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या बंद स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीबाबतही चर्चा झाली. ग्रामपंचायतीने त्याचे काम सुरू केले होते; मात्र जागा शासकीय असल्याच्या तक्रारीनंतर ते काम थांबविण्यात आले होते. राज्यातील रस्त्यालगतची बसस्थानके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत असल्याने त्याबाबत अडचण नसल्याचे बेहरे यांनी स्पष्ट केले. जुने बसस्थानक पाडून त्याच जागी कॅन्टीन, स्वच्छतागृह आदी सुविधांसह नवीन बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. नवीन बसस्थानकाच्या आराखड्यात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच समोरील दोन्ही बाजूंना गाळे उभारावेत, अशी सूचना खंडागळे व देसाई यांनी केली. गाळ्यांमधून आगाराला उत्पन्न मिळेल आणि त्यातून बसस्थानकाची देखभाल करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. या सूचनेला एसटी प्रशासनाने अनुकूलता दर्शविली.

COMMENTS