Homeताज्या बातम्या

कोपरगावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना गतीवाढीव निधीसह प्रशासकीय मंजुरी देण्याचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश

कोपरगाव : जल जीवन मिशनअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासह प्रशासकीय

बीड शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न पुन्हा सभागृहात; २० दिवसांआड येणारे पाणी २ दिवसांवर आणण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी महावितरणला वर्ग करण्याची आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी
कोपरगाव-निफाड परिसरातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी; आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, ७.२९ कोटींचा निधी मंजूर
ई-२० पेट्रोलचे दर ८५ रुपये करा किंवा निर्णय मागे घ्या; अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा!

कोपरगाव : जल जीवन मिशनअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासह प्रशासकीय व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. आ. आशुतोष काळे यांच्या मागणीनुसार बुधवारी (दि. ८) मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मतदारसंघातील अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे तांत्रिक अडचणी, सुधारित प्रशासकीय मान्यता आणि वाढीव निधीअभावी प्रलंबित आहेत. या योजनांना गती देण्यासाठी आमदार काळे यांनी विशेष बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत त्यांनी मतदारसंघातील विविध योजनांच्या अडचणी मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, कुंभारी, मायगाव देवी, सुरेगाव, मळेगाव थडी, धारणगाव, रवंदे, रांजणगाव देशमुख, शिंगणापूर, वारी-कान्हेगाव तसेच राहाता तालुक्यातील रुई-शिंगवे, पुणतांबा व नपावाडी येथील जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी करण्यात आली.  
मतदारसंघातील पूर्व भागातील उक्कडगाव, गोधेगाव, शिरसगाव, सावळगाव, घोयेगाव, तळेगाव-मळे, धोत्रे, तिळवणी, आपेगाव, कासली, लौकी, भोजडे आदी गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी आ. काळे यांनी केली. तसेच कोकमठाण येथील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यासह मढी बुद्रुक, कारवाडी, वेळापूर, ब्राह्मणगाव, धामोरी, टाकळी, मोर्विस, काकड-मल्हारवाडी, पढेगाव, करंजी बुद्रुक, खिर्डी गणेश, संवत्सर, धोत्रे, माहेगाव देशमुख, मंजूर, शहाजापूर, नाटेगाव आदी गावांतील योजनांसाठी आवश्यक जागा संपादनास मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.
माहेगाव देशमुख येथील जल जीवन मिशन योजनेच्या वाढीव प्रस्तावास मान्यता देण्यासह पूर्ण झालेल्या योजनांसाठी साठवण तलाव उभारण्याकरिता अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. या मागण्यांवर मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.
  बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीरंग नाईक, अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक दीपाली देशपांडे, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर आदी उपस्थित होते.

COMMENTS