नांदेड : नांदेड जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला वेग आला असताना, ग्राहकांची पूर्वसंमती न घेता आणि पुरेशी माहिती न देता मीटर बस

नांदेड : नांदेड जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला वेग आला असताना, ग्राहकांची पूर्वसंमती न घेता आणि पुरेशी माहिती न देता मीटर बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नांदेड जिल्हा शाखेने जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर करून ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे.
पूर्वसंमतीशिवाय मीटर बसवणे ग्राहक हक्कांचे उल्लंघन
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष रमेश मस्के आणि जिल्हा सचिव संतोष कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील विविध भागांमध्ये पारंपरिक वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि आवश्यक जनजागृती न करता स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्मार्ट मीटरमुळे होणारे फायदे-तोटे, बिल आकारणीची पद्धत, प्रीपेड प्रणालीचे परिणाम आणि तांत्रिक अडचणींबाबत अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता मीटर बसविणे हे ग्राहक हक्कांचे उल्लंघन ठरू शकते, असा इशारा ग्राहक पंचायतीने दिला आहे.
ग्राहक पंचायतच्या ५ प्रमुख मागण्या:
१. ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी.
२. स्मार्ट मीटर संदर्भात व्यापक जनजागृती आणि सार्वजनिक चर्चा आयोजित करावी.
३. ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करावी.
४. मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांची लेखी संमती बंधनकारक करावी.
५. स्मार्ट मीटरमुळे होणार्या आर्थिक व तांत्रिक परिणामांची संपूर्ण माहिती ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी.
कोणतीही नवी यंत्रणा लागू करण्यापूर्वी ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे असून, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची स्पष्ट हमी द्यावी, अशी अपेक्षा अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS