Homeताज्या बातम्या

रखडलेल्या महामार्गाच्या निषेधार्थ राहुरीत घरांवर काळे झेंडे

देवळाली प्रवरा: "घरावर काळा झेंडा म्हणजे फक्त निषेध नाही, तर मृत्यूच्या महामार्गाविरोधातील जनतेचा आक्रोश आहे!" अशी भावना व्यक्त करत राहुरी शहराती

कळसाचे दर्शन म्हणजेच विठ्ठलाचे दर्शन; ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याच्या कीर्तनात निरूपण
झुरळाने हुकूमशहाला देखील हरवले…; उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत उत्साह
‘बीओटी’ शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रशासकीय धुळखात; पुनर्वसनाचा प्रश्न रखडल्याने शेवगावच्या टपरीधारकांचा एल्गार

देवळाली प्रवरा: “घरावर काळा झेंडा म्हणजे फक्त निषेध नाही, तर मृत्यूच्या महामार्गाविरोधातील जनतेचा आक्रोश आहे!” अशी भावना व्यक्त करत राहुरी शहरातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वरील शिर्डी–अहिल्यानगर (नगर–मनमाड) महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ घराघरांवर काळे झेंडे फडकावले. तब्बल १२ वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गामुळे हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. असंख्य भीषण अपघातांत अनेकांना प्राण गमवावे लागले, तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तरीही संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही संबंधित यंत्रणांवर ताशेरे ओढले होते. मात्र, त्यानंतरही महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. नुकत्याच झालेल्या पावसात नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा काही भाग खचल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी रस्ता दुरुस्ती कृती समितीने रस्त्याचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी, विविध आंदोलने, निवेदने आणि इतर लोकशाही मार्गांचा अवलंब केला. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर नागरिकांनी घरांवर काळे झेंडे लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. महामार्गाचे काम करणारी मे. भारत कन्स्ट्रक्शन, गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी असलेली मे. लायन्स कंपनी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कथित निष्क्रिय व मनमानी कारभाराविरोधात हा निषेध असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. राहुरीकरांनी दिलेला हा “काळ्या झेंड्यांचा इशारा” आता प्रशासनाला जाग आणणार का, की नागरिकांना अजून किती काळ मृत्यूच्या सापळ्यावरून प्रवास करावा लागणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS