नांदेड : जलसंपदा विभागातील बदली आणि नियुक्त्यांच्या अलीकडील आदेशांमुळे नांदेड जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. विशे

नांदेड : जलसंपदा विभागातील बदली आणि नियुक्त्यांच्या अलीकडील आदेशांमुळे नांदेड जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या नांदेड विभागात कार्यरत असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अक्षरशः “संगीत खुर्ची”चा खेळ सुरू असून, “तू माझ्या खुर्चीवर बस, मी तुझ्या खुर्चीवर बसतो” अशा पद्धतीने केवळ पदांची अदलाबदल होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाशी संबंधित कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर आणि विजय कुरुंदकर यांच्या बदल्यांनंतरही प्रत्यक्षात दोघेही नांदेडमधीलच महत्त्वाच्या पदांवर कायम राहिले आहेत. त्यामुळे या बदल्यांचा मूळ उद्देश नेमका काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मंत्रालयातून विशेष मेहरबानी? याचबरोबर काही अधिकाऱ्यांवर मंत्रालयातून विशेष मेहरबानी झाल्याचेही बोलले जात आहे:
- चारुदत्त बनसोड : नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता बनसोड यांना त्यांच्या सध्याच्या पदावरच शासनाने थेट एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
- अभय जगताप : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता जगताप यांना त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत त्याच पदावर कायम राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सामान्यतः कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अन्यत्र बदली होणे अपेक्षित असताना, नियमांमध्ये विशेष सवलत देत या अधिकाऱ्यांना नांदेडमध्येच कायम ठेवण्यात आल्याने जलसंपदा विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. उन्हाळ्याच्या काळात जिल्ह्यातील जलव्यवस्थापन आणि सिंचन प्रकल्पांचे नियोजन महत्त्वाचे असताना, प्रकल्पांच्या कामांऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोयीलाच प्राधान्य दिले जात असल्याची खोचक चर्चा कर्मचारी वर्तुळात सुरू आहे.

COMMENTS