जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांना भुसावळ न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खडसे पिता-कन्येला मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या समर्थकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मानपूर येथील रहिवासी चमेलाबाई तायडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या आरोपानुसार, सन २००२ मध्ये तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. संबंधित जमिनीच्या व्यवहारासाठी केवळ नाममात्र रक्कम देऊन जमीन बळकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या तक्रारीच्या आधारे बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्याविरुद्ध फसवणूक, कागदपत्रांमध्ये फेरफार तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची शक्यता निर्माण झाल्याने दोघांनी भुसावळ न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खडसे आणि त्यांच्या कन्येला अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास सुरू राहणार असला तरी तात्काळ अटकेची शक्यता टळली आहे.

COMMENTS