नांदेड : संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वप्नरंग नाट्य महोत्सवाचे उद्घाट

नांदेड : संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वप्नरंग नाट्य महोत्सवाचे उद्घाटन डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर कविता मुळे यांनी नांदेडमध्ये दर्जेदार नाट्य महोत्सवांचे सातत्य कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वप्नरंग संस्थेच्या सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत महानगरपालिका आणि स्वतःचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास उपमहापौर दीपकसिंग रावत, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, ज्येष्ठ रंगकर्मी राजीव किवळेकर, लक्ष्मण संगेवार आणि डॉ. राम चव्हाण उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दिनेश कवडे यांनी महोत्सवामागील भूमिका स्पष्ट करत नाट्यकलेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. उद्घाटनप्रसंगी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. यानंतर माणूस फाऊंडेशन, मुंबई प्रस्तुत डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित ’अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस’ या नाटकाचा प्रभावी प्रयोग सादर झाला. कलाकारांच्या दमदार अभिनयाला नाट्यरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महोत्सवात ४ ऑगस्ट रोजी ’फारच टोचलं’, ’खुपसा डायरी’ आणि ’आनंद ओवरी’ हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.

COMMENTS