पुणे : राज्यातील सततच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी आ
पुणे : राज्यातील सततच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग रोखून आंदोलन केले.
सध्या कांद्याला मिळणारा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीसाठी केलेली गुंतवणूकही परत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने शेतकरी मंचर येथे एकत्र आले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी आपल्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
या आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अतुल बेनके यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी हितासाठी दिल्लीपासून राज्यस्तरापर्यंत अनेक बैठका झाल्या. मात्र त्यातून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविणे ही आमची जबाबदारी असल्याचे सांगत सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभाव, बाजार हस्तक्षेप आणि तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.
आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणाने स्टेजवरच खिशातून औषधाची बाटली काढून ती पिण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप केला आणि त्याला रोखले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS