नांदेड: केंद्र व राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाने मंगळवारी नांदेड येथे भव्य ‘आसूड मोर्चा’ काढत जोरदार शक्तिप्रदर्शन क

नांदेड: केंद्र व राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाने मंगळवारी नांदेड येथे भव्य ‘आसूड मोर्चा’ काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेस भवन, नवा मोंढा येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मोर्चानंतर झालेल्या सभेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली.
यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा खासदार रवींद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. नव्या नेतृत्वाच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याचे वातावरण सभास्थळी दिसून आले.
सपकाळ यांचे सरकारवर प्रमुख आरोप सभेला संबोधित करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, खासदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारून संघटनेप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. सरकारची चुकीची आर्थिक आणि कृषी धोरणेच याला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारने लाडकी बहीण, शेतकरी, विद्यार्थी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांची फसवणूक केल्याचेही ते म्हणाले. वाढती महागाई, इंधनाचे शंभरीपार गेलेले दर, हजार रुपयांच्या पुढे गेलेला गॅस सिलेंडर आणि शेतमालाला हमीभाव न मिळण्याच्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. वन नेशन, वन इलेक्शन ही संकल्पना केवळ दिखावा असून वन नेशन, वन पार्टी हा त्यामागील खरा हेतू असल्याचा आरोप करत संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा त्यांनी दिला.
रवींद्र चव्हाण यांचा निर्धार दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा खासदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गेंड्याची कातडी असलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आसूड ओढण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसचा झेंडा खाली पडू दिला नाही, याची आठवण त्यांनी करून दिली. काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास कधीहीघात करणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची ताकद निर्माण करू, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना २०२९ च्या निवडणुकांसाठी आतापासून तयारीला लागण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमातील महत्त्वाच्या घडामोडी यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी मनोगत व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार मानले. कार्यक्रमादरम्यान अर्धापूर तालुक्यातील अशोक बुटले, सिडको येथील विनोद कांचनगिरे, नांदेड शहरातील शेख हतीम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मोर्चा आणि सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे नांदेडमध्ये दिवसभर काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS