एवढा गहजब कशासाठी ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

एवढा गहजब कशासाठी ?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जो गदारोळ सुरू आहे, तो बघता राज्यातील सर्व प्रश्‍न संपले की काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना न पडो, तरच नवल. आरोप-प्र

काँगे्रसचे प्रियंका अस्त्र चालणार का?
कारागृहातील प्रशासनाला हादरे
नावात काय आहे ?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जो गदारोळ सुरू आहे, तो बघता राज्यातील सर्व प्रश्‍न संपले की काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना न पडो, तरच नवल. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत, एकमेकांचा जात-धर्म काढणे सुरू आहे. एवढा गहजब नेमका कशासाठी सुरू आहे. याचे उत्तर ना सत्ताधार्‍यांकडे आहे ना विरोधकांकडे. बरे हा केंद्र-राज्य संघर्ष असेल, तर मग एका अधिकार्‍यावर याचे खापर कसे फोडता येईल. समीर वानखेडे या अधिकार्‍यांविरोधात राष्ट्रवादी काँगे्रसचे मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांची मालिकाच उघडली आहे.

नवाब मलिक यांची बाजू कमी पडते की काय म्हणून त्यांच्या दिमतीला आता डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी तर क्रांती रेडकर यांना थेट धमकीच दिली आहे. सांभाळून बोला, जर तुमचा इतिहास काढला तर हमाम मे सब नंगे है, असा इशारा दिला. राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्याचे आरोप कमी पडतायत की काय, त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उडी मारली. राष्ट्रवादीच्या तीन मंत्र्यांची वक्तव्ये कमी होत नाही, तोच शिवसेना नेते संजय राऊत यांनी याप्रकरणात उडी घेतली. आपण सत्ताधारी पक्षाचे नेते आहोत, आपल्या हाती सगळया चौकशी यंत्रणां आहेत, याचाच विसर या नेत्यांना पडल्याचे दिसून येत आहे. ड्रग्ज प्रकरण इतके गंभीर वळण घेईल, असे कुणालाही वाटले नाही. मात्र साक्षीदार फुटणे, दररोज नवे आरोप, या संपूर्ण प्रकरणामुळे या ड्रग्ज प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. मात्र हे प्रकरण राजकीय वळण घेत असतांना, एखाद्या व्यक्तीचे खासगी जीवन यात ओढले जायला नको होते. मात्र मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे यांच्या खासगी आयुष्यात अति प्रमाणात डोकावतांना दिसून येतात. केंद्र सरकार राज्याला बदनाम करू पाहत आहे, ड्रग्ज प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा आरोप राज्यकर्त्यांनी केला आहे. हा आरोप खरा असेल, तर राज्यकर्त्यांनी थेट केंद्रांच्या विरोधात मोर्चा उघडावा. मात्र असे न करता, एका अधिकार्‍याविरोधात मोर्चा उघडून, त्याचे खासगी आयुष्यात डोकावले जाते. एका अधिकार्‍याच्या विरोधात तीन-तीन मंत्री उभे ठाकतात याला काय म्हणावे. सर्व काही ऐकीव माहितीवर आधारित सुरु आहे. मुख्य मुद्दा आहे, वानखेडे यांनी आपल्या पंचामार्फत शाहरूख खानकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप. तर याप्रकरणी शाहरूख खान याने किंवा त्याची मॅनेजर पुजाने समोर येऊन काय ते स्पष्ट करावे. कुणी लाच मागितली, कुणी फोन केला होता, 50-50 लाखांच्या बॅगा कुणी दिल्या, ही माहिती स्पष्ट होईलच. मात्र या दिशेने कुणीही पावले टाकतांना दिसून येत नाही. राहिला प्रश्‍न समीर वानखेडे यांच्या धर्मांचा. परंतु त्यांच्या धर्माचा, जातीचा, या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणांशी कुठे संबंध येतो. कोण कुठल्या धर्माचे आचरण करतो, कुठला धर्म स्वीकारतो, या बाबी प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीय बाबी आहेत. आणि त्या व्यक्तीगत बाबीवर तुम्ही ज्याप्रकारे आक्रमण होत आहे, ते समीर वानखेडे यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघनच म्हणावे लागेल. राहिला प्रश्‍न समीर वानखेडे याने धर्मांतर केले असतांना, अनुसूचित जातीचे प्रमाणपत्राचा लाभ उठवत सरकारी नोकरी मिळवल्याचा. तर आपल्याकडे कायदेशीर यंत्रणा आहेत, त्याद्वारे याची सत्यता तपासता येईल. जर समीर वानखेडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल. किंवा त्यांच्या नोकरीवर गंडातर येईल. पण प्रश्‍न उरतो, राज्यात इतक्या दिवसांपासून जो गहजब सुरू आहे, तो नेमका कशासाठी. भलेही यात समीर वानखेडे दोषी आढळतील, किंवा निर्दोष आढळतील. मात्र त्यासाठी कायदेशीर लढा नवाब मलिक देऊ शकतात. मात्र ते न करता, सोशल माध्यमांवर, पत्रकार परिषदा रोज घेऊन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकरणात का केला जात आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. परंपरा आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातील शांतता गढूख करण्याचा प्रयत्न का केला जात आहे.

COMMENTS