नांदेड: लखनऊ येथील कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा प

नांदेड: लखनऊ येथील कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, होस्टेल्स आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आज नांदेड हे महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक केंद्रांपैकी एक बनले असून विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हजारो विद्यार्थी येथे दाखल होत आहेत.
शहरातील बाबानगर, शामनगर, विवेकनगर, श्रीनगर, भाग्यनगर, अशोकनगर, कैलासनगर, इंद्रप्रस्थनगर, पाटणकरनगर, टिळकनगर, आयटीआय परिसर, नवा मोंढा, स्टेडियम परिसरातील गोकुळनगर, छत्रपतीनगर, अंबिकानगर आदी भागांमध्ये शेकडो कोचिंग क्लासेस आणि अभ्यासिका कार्यरत आहेत. अनेक संस्था बहुमजली इमारतींमध्ये सुरू असून काही ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन जिने, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, अग्निशामक यंत्रे आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची तक्रार पालक आणि नागरिकांकडून केली जात आहे.
एकाच वर्गात २५० विद्यार्थ्यांची गर्दी; नियमांचे उल्लंघन
विशेष म्हणजे अनेक क्लासेसमध्ये एका वर्गात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जातात. काही ठिकाणी २०० ते २५० विद्यार्थ्यांपर्यंत गर्दी होत असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत आग, शॉर्टसर्किट किंवा इतर कोणतीही आपत्ती उद्भवल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील अनेक शैक्षणिक संस्था अरुंद इमारती, बेसमेंट किंवा अपुर्या वायुवीजनाच्या जागांमध्ये चालत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. लखनऊसारखी दुर्घटना नांदेडमध्ये घडल्यास त्यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच बर्याच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून रस्त्यावर वाहने उभी करावी लागत असल्याने वाहतुकीचाही प्रश्न निर्माण होत आहे.
कठोर नियमावली आणि संयुक्त मोहिमेची मागणी
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक कोचिंग क्लाससाठी सक्तीचे फायर ऑडिट आणि वार्षिक सुरक्षा प्रमाणपत्र अनिवार्य केले पाहिजे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या अग्निशमन, बांधकाम आणि परवाना विभागाने संयुक्त विशेष मोहीम राबवून केवळ कागदोपत्री तपासणी न करता प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे. शाळा व महाविद्यालयांपैकी खाजगी कोचिंग क्लासेससाठी स्वतंत्र नियामक धोरण असावे, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून केली जात आहे.
कोचिंग क्लासेससाठी आवश्यक सुरक्षा नियम:
- दरवर्षी सक्तीचे फायर ऑडिट आणि वैध अग्निसुरक्षा प्रमाणपत्र अनिवार्य असणे.
- प्रत्येक मजल्यावर अग्निशामक यंत्रे, स्मोक डिटेक्टर व फायर अलार्म प्रणाली बसवणे.
- आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी किमान दोन मार्ग असणे.
- नियमित फायर ड्रिल, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि ६ महिन्यांनी सुरक्षा यंत्रणांची तपासणी करणे.
तातडीने कोणत्या उपाययोजना गरजेच्या?
- एका वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित करणे.
- बेसमेंट आणि अरुंद जागेतील क्लासेसची कसून तपासणी करणे.
- महानगरपालिका व शिक्षण विभागाचे संयुक्त सर्वेक्षण करून नियमभंग करणार्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करणे.
- होस्टेल्स व अभ्यासिकांची विशेष सुरक्षा तपासणी करणे.
नफा महत्त्वाचा की विद्यार्थ्यांचा जीव?
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा जास्त संख्येने वर्गांमध्ये कोंबून आर्थिक नफा कमावण्यापेक्षा त्यांच्या जीविताची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी ती होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासन, संस्थाचालक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. सुरक्षित शिक्षणाचा हक्क प्रत्येक विद्यार्थ्याचा असून निष्काळजीपणाची किंमत विद्यार्थ्यांच्या जीवाने मोजावी लागू नये, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.

COMMENTS