निवडणुकीआधीच डील; अटी-शर्ती गुप्त ठेवल्याने विरोधकांचा आक्षेपढाका : भारतानंतर आता बांग्लादेशही अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याच्या मार्गावर असल्या

निवडणुकीआधीच डील; अटी-शर्ती गुप्त ठेवल्याने विरोधकांचा आक्षेप
ढाका : भारतानंतर आता बांग्लादेशही अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आंतरराष्ट्रीय व्यापार व राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 9 फेब्रुवारी रोजी बांग्लादेश-अमेरिका व्यापार करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, विशेष म्हणजे हा करार देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघ्या 72 तास आधी केला जाणार आहे. कराराच्या अटी व शर्ती अद्याप जाहीर न झाल्याने हा व्यवहार ‘गुप्त’ पद्धतीने होत असल्याचा आरोप होत असून, त्यावरून तीव्र टीका होत आहे.
भारत-अमेरिका व्यापार करारानंतर बांग्लादेश सरकारनेही घाईघाईने अमेरिकेसोबत डील अंतिम करण्याची पावले उचलल्याचे चित्र आहे. भारतासोबत झालेल्या करारानुसार अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केले. त्यामुळे अमेरिकन बाजारात आपला पारंपरिक वाटा कमी होण्याची भीती बांग्लादेशला भेडसावत आहे. बांग्लादेशची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला होणार्या रेडीमेड गारमेंट्सच्या निर्यातीवर अवलंबून आहे. अमेरिकेला होणार्या एकूण निर्यातीपैकी जवळपास 90 टक्के वाटा या वस्त्रउद्योगाचा आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेने बांग्लादेशी वस्तूंवर 37 टक्के टॅरिफ लावले होते. त्यानंतर जुलैमध्ये ते 35 टक्क्यांवर, तर ऑगस्टमध्ये 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. आता प्रस्तावित नव्या व्यापार करारानंतर हे शुल्क आणखी घटून 15 टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 2025 च्या मध्यात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने अमेरिकेसोबत एक औपचारिक नॉन-डिस्क्लोजर अॅग्रीमेंट केल्याची माहिती समोर आली आहे. या करारानुसार टॅरिफ व व्यापारासंबंधी सर्व चर्चा गोपनीय ठेवण्याचे मान्य करण्यात आले आहे. हा करार ना संसदेसमोर मांडण्यात आला, ना उद्योगजगताशी किंवा जनतेशी त्याचा मसुदा शेअर करण्यात आला, ही बाब वादग्रस्त ठरत आहे.

COMMENTS