खासगी रुग्णालयांनी ऑडिटर तपासणीची बंधने झुगारली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासगी रुग्णालयांनी ऑडिटर तपासणीची बंधने झुगारली

नगर शहरातील 26 रुग्णालयांत कोरोना उपचार घेत असलेल्या रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये, म्हणून महापालिकेने या प्रत्येक रुग्णालयांतील बिले तपासणीसाठी ऑडिटर नेमले आहेत; पण ही बंधने खासगी रुग्णालयांनी झुगारली आहेत.

इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड- २०२१ मिळाल्याबद्दल ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चित्रकार राहूल भालेराव यांचा सत्कार
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद
रुग्णालयांसमोरील गर्दी आता पोलिसांचे टार्गेट ; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले उपाययोजनांचे आदेश

अव्वाच्या सव्वा बिल वसुली सुरूच, आरोग्य समितीने दिला कारवाईचा इशारा

अहमदनगर/प्रतिनिधीः नगर शहरातील 26 रुग्णालयांत कोरोना उपचार घेत असलेल्या रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये, म्हणून महापालिकेने या प्रत्येक रुग्णालयांतील बिले तपासणीसाठी ऑडिटर नेमले आहेत; पण ही बंधने खासगी रुग्णालयांनी झुगारली आहेत. या ऑडिटर मंडळींना रुग्णालयांकडून कोणतेही सहकार्य होत नाही व दुसरीकडे रुग्णांची आर्थिक लुटालूट सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मनपाने नव्यानेच स्थापन केलेल्या आरोग्य समितीने खासगी रुग्णालयांवर कारवाईचा इशारा दिला आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सध्याच्या दुसर्‍या लाटेच्या काळामध्येही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांच्या होत असलेल्या आर्थिक लुटीचा विषय नगरमध्ये गाजत आहे. मागील काळातील 15 रुग्णालयांकडील एक कोटी 13 लाखाची वसुली अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे सध्याच्या काळात रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसू नये, म्हणून महापालिकेने कोरोनावर उपचार करणार्‍या 26 रुग्णालयांसाठी ऑडिटर नेमले आहेत व रुग्णालयांनी रुग्णांना बिल देण्याआधी ते ऑडिटरकडून तपासून व त्यांनी मान्य केल्यानंतरच बिल घेण्याचे बजावले आहे; पण या आदेशाकडे खासगी रुग्णालयांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे. शहरातील काही रुग्णालये शासनाने ठरवून दिलेल्या आदेशामध्ये पळवाटा काढून कोरोना रुग्णांना वाढीव बिले देऊन लूट करत आहे. काही खासगी रुग्णालयांनी अजूनपर्यंत ऑडिटरला हॉस्पिटलमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली नाही. कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्यासंदर्भात पूर्वकल्पना ऑडिटरला दिली जात नाही, असे खुद्द ऑडिटरांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मनपाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी ऑडिटरला हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी व शहरातील काही खासगी हॉस्पिटल चालकांकडून रुग्णांची होणारी लूटमार थांबवली नाही तर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मनपा आरोग्य समितीच्यावतीने विविध रुग्णालयांतून नेमून दिलेल्या ऑडिटरांची नुकतीच आढावा बैठक घेतली. या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. बोरुडे यांच्यासह सदस्य निखील वारे, नगरसेवक सचिन जाधव, सतीश शिंदे तसेच ऑडिटर प्रवीण मानकर, निवृत्ती खेतमाळीस, राजेंद्र येळीकर, सुरेश घायमुक्ते, रमेश कासार, भाग्यश्री जाधव आदी उपस्थित होते.

आमच्याकडे पुरावे

सध्याच्या संकट काळात कोणीही गैरफायदा उचलू नये. काही हॉस्पिटलची विविध प्रकरणे पुराव्यासहित आमच्याकडे आली आहेत. शासनाच्या कुठल्याही अटी-शर्तीचे पालन त्यांच्याकडून केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने मानवसेवेच्या भावनेतून काम करावे, असे आवाहन आरोग्य समितीने खासगी रुग्णालयांना केले आहे तसेच बिल भरण्याच्या अगोदरच शासकीय नियमांचे पालन झाले आहे, की नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे. आरोग्य ही मानवसेवा समजून प्रत्येक डॉक्टरांनी आपली आरोग्यसेवा करावी, यासंकट काळामध्ये प्रत्येकाला सहकार्याची खरी गरज आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS