Homeताज्या बातम्या

मुदखेडच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – आमदार श्रीजया चव्हाण

मुदखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसह व्यापार्‍यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रय

संसदेतील गदारोळामुळे जनतेच्या प्रश्‍नांवरील चर्चा रखडली; विरोधकांवर खा. अशोकराव चव्हाण यांची टीका
संत शिरोमणी गोरोबा काका जयंतीनिमित्त नांदेडमध्ये आज भव्य शोभायात्रा; गुणवंत विद्यार्थी व समाजरत्नांचा होणार गौरव
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक; तब्बल ९५.५४ टक्के विक्रमी मतदानाची नोंद



मुदखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसह व्यापार्‍यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार श्रीजया चव्हाण यांनी दिली.
मुदखेड येथील मोंढा परिसरात आमदार  चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापार्‍यांची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी त्यांनी व्यापार्‍यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या व विकासासंदर्भातील मागण्या जाणून घेतल्या. बैठकीदरम्यान व्यापार्‍यांनी रेल्वे गेटमुळे शहराचे दोन भाग पडल्याने वाहतूक व व्यापारावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून पादचारी पूल, अंडरब्रिज अथवा रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच मोंढा परिसरातील व्यापारी संकुले आणि जागा गायरान क्षेत्रात येत असल्याने त्या जागा व्यापार्‍यांच्या नावे करून देण्याची मागणीही करण्यात आली. याशिवाय मुदखेड शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी इंग्रजी माध्यमाची गुणवत्तापूर्ण शाळा सुरू करण्याची मागणीही व्यापार्‍यांनी आमदारांसमोर मांडली. व्यापार्‍यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत आमदार श्रीजया चव्हाण यांनी रेल्वे ओव्हरब्रिजच्या प्रस्तावासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच व्यापारी जागांच्या मालकी हक्काच्या प्रश्नासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीस नगराध्यक्षा विश्रांती कदम, माजी उपनगराध्यक्ष माधव कदम,  गटनेते सुनील शेटे, उपाध्यक्ष इम्रान मच्छीवाले, नगरसेवक रामसिंग चव्हाण, नगरसेवक संजय आऊलवार, डॉ. संदीप पचलिंग, संजय सोनटक्के, ऋषिकेश पारवेकर, उपेंद्र देवदे, प्रभाकर पांचाळ, माधवराव चमकुरे, नितीन चौदंते यांच्यासह शंकर राठी यांच्यासह अनेक पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यापार्‍यांच्या प्रमुख मागण्या
रेल्वे गेट समस्येवर रेल्वे ओव्हरब्रिज/अंडरब्रिज उभारणे., मोंढा परिसरातील गायरान क्षेत्रातील व्यापारी जागा मालकी हक्काने देणे., मुदखेडमध्ये दर्जेदार इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे., शहरातील व्यापार व वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना करणे.

COMMENTS