Homeताज्या बातम्या

नांदेड विधान परिषद : नोटांच्या राजकारणाने निष्ठा गिळंकृत; राजूरकरांच्या विजयाने महाविकास आघाडीचा बुरखा फाटला!सत्तेच्या सौद्यात पक्षनिष्ठांचा बाजार; पडद्यामागील गुप्त हातमिळवणीने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीने पक्षनिष्ठा, विचारधारा आणि आघाड्यांच्या घोषणांचा फोलपणा उघड करून दाखवला आहे. मत

महायुतीचा धर्म सर्वोच्च; नांदेडमध्ये एकसंघतेचा संदेशसंवादातूनच राजकीय प्रश्नांचे निराकरण शक्य; महायुती अधिक बळकट करण्याचा निर्धारराज्यातील जागावाटपाचा निर्णय सर्वांनी स्वीकारावा; नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर यांच्याभोवती महायुती एकवटली – खासदार अशोकराव चव्हाणप्रवीण चिखलीकरांचा अर्ज मागे; अमरनाथ राजूरकरांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा – आमदार  चिखलीकर
नांदेड विधान परिषद निवडणूक : अंकगणित भाजपच्या बाजूने, पण राजकारण अजूनही उघडेच!
नांदेड विधानपरिषद रणसंग्राम : चव्हाणांचे ‘चाणक्य’ राजूरकर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर; महायुतीतील छुप्या संघर्षाचीही चर्चा



नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीने पक्षनिष्ठा, विचारधारा आणि आघाड्यांच्या घोषणांचा फोलपणा उघड करून दाखवला आहे. मतदारसंघातील ही निवडणूक केवळ मतदानाची प्रक्रिया नव्हती, तर ती सत्तेच्या सौद्यांची, आर्थिक ताकदीची आणि पडद्यामागील राजकीय हातमिळवणीची प्रचिती देणारी ठरली. पक्षनिष्ठेच्या आणाभाका घेणारे अनेक लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळी मात्र वेगळ्याच दिशेने झुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाचा मार्ग केवळ अधिकृत पाठिंब्याने नव्हे, तर विरोधी गोटातील काहींनी केलेल्या मौन सहकार्यामुळे अधिक सुकर झाल्याचे बोलले जात आहे. उघडपणे विरोध करणारे आणि बंद दाराआड मैत्री करणारे चेहरे या निवडणुकीत स्पष्टपणे समोर आल्याने राजकारणात शत्रू कायमचा नसतो ही उक्ती पुन्हा अधोरेखित झाली. राजकारणात एकमेकांविरोधात उभे ठाकलेले माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अप्रत्यक्ष राजकीय समीकरण या निवडणुकीतील निर्णायक घटक ठरल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांच्या रणनीतीपुढे विरोधकांची सारी गणिते कोसळली आणि राजूरकरांच्या तिसर्‍या विजयाचा मार्ग जवळपास निर्विघ्न झाला. महाविकास आघाडीचा विस्कळीत कारभार; उमेदवारीवरूनच झाला गोंधळ महाविकास आघाडीला ही निवडणूक एकत्रित ताकद दाखविण्याची संधी होती. मात्र अंतर्गत मतभेद, संभ्रम आणि नेतृत्वातील विसंवादामुळे ही संधी वाया गेली. काँग्रेसकडे जागा असतानाही उमेदवारीवरून सुरू झालेला गोंधळ, रामदास पाटील सुमठानकर यांची माघार आणि माजी आमदार माधवराव जवळगावकर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्र उमेदवार उभा करून लढाई रंगविण्याचा प्रयत्न केला. मात्र मित्रपक्षांचा अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने त्यांचे संपूर्ण गणित कोलमडले. प्रचारापासून काही प्रमुख नेते दूर राहिल्याच्या चर्चा आणि काही आमदारांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्या भेटी घेतल्यामुळे आघाडीतील अंतर्गत संशय आणखी गडद झाला. निष्ठेपेक्षा नोटांची ताकद मोठी? या निवडणुकीने एक कटू वास्तव पुन्हा समोर आणले आहे. पक्षीय विचारधारा, निष्ठा आणि कार्यकर्त्यांच्या भावना या केवळ भाषणांपुरत्याच मर्यादित राहिल्या असून, प्रत्यक्ष राजकारणात सत्तेची समीकरणे आणि आर्थिक ताकद यांनाच अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, अशी भावना अनेक राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. नांदेड विधान परिषद निवडणूक संपली असली, तरी तिने अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत. पक्षनिष्ठेचा जयघोष करणार्‍या नेत्यांचे मुखवटे गळून पडले का? छुप्या युतींचे राजकारण आता उघडपणे स्वीकारले जात आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा सौदा करून मिळवलेले विजय भविष्यात राजकीय स्थैर्य टिकवू शकतील का? नांदेडच्या राजकारणात या निवडणुकीने केवळ एक आमदार निवडून दिलेला नाही, तर अनेकांच्या निष्ठेचा आणि नैतिकतेचाही खरा चेहरा जनतेसमोर आणल्याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.

COMMENTS