नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी रविवारी (२६ जुलै) जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर शांततेत आणि उत्सा
नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी रविवारी (२६ जुलै) जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण १,३४४ मतदारांपैकी १,२८४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून, एकंदरीत ९५.५४ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग नोंदवला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार अमरनाथ राजूरकर, मारोतराव कवळे, प्रणिता देवरे-चिखलीकर आणि डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार अर्धापूर, मुदखेड, धर्माबाद, भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर आणि माहूर या तालुक्यांमध्ये १०० टक्के मतदान झाले. याशिवाय किनवट (९९.१०%), देगलूर (९९.०४%), बिलोली (९८.६१%), कंधार (९३.६५%), नांदेड (९२.९३%), नायगाव (९२%), लोहा (८९.१९%) आणि मुखेड (८८.४६%) येथेही मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या निवडणुकीचा निकाल सहकार क्षेत्रातील आगामी राजकीय समीकरणे ठरवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असल्याने आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

COMMENTS