नांदेड : नांदेड शहरात सध्या उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे महावितरणच्या कारभाराने नागरिकांच्या संतापाचा पारा अधिकच वाढवला आहे. कोणतेही स्पष्ट क

नांदेड : नांदेड शहरात सध्या उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे महावितरणच्या कारभाराने नागरिकांच्या संतापाचा पारा अधिकच वाढवला आहे. कोणतेही स्पष्ट कारण नसताना शहरातील विविध भागांत वारंवार वीज खंडित होत असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. दिवस असो वा रात्र, वीज केव्हा जाईल आणि केव्हा येईल याचा काही नेम उरलेला नाही. परिणामी, घरगुती कामे विस्कळीत झाली असून रात्री झोपेसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.
नागरिकांमध्ये आता एकच प्रश्न चर्चिला जात आहे – नेमकं महावितरणचं पाणी मुरतंय कुठं? दोष बेजबाबदार अधिकार्यांचा आहे का? कामचुकार कर्मचार्यांचा आहे का? तांत्रिक कर्मचार्यांवर वाढलेला ताण आहे का? की आवश्यक उपकरणे, साहित्य आणि देखभालीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे? शहरातील अनेक भागांत ट्रान्सफॉर्मरवर ताण वाढणे, जळालेल्या फ्यूजची वेळेत दुरुस्ती न होणे, जीर्ण तारांमुळे निर्माण होणारे फॉल्ट, लोंबकळणार्या केबल्स, सैल जोडण्या, झाडांच्या फांद्यांचा स्पर्श, कमी मनुष्यबळ आणि तक्रारींना विलंबाने प्रतिसाद अशा अनेक समस्या नागरिकांनी वारंवार मांडल्या आहेत. मात्र, या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी तांत्रिक बिघाड हे एकच ठरलेले उत्तर दिले जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. पूर्वी एवढा भोंगळ कारभार कधीच दिसून येत नव्हता, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. काही वर्षांपूर्वी वीजपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तरी त्या तातडीने दुरुस्त होत. आता मात्र लहानसहान बिघाडासाठी तासन्तास वीज गायब राहते. हेल्पलाईनवर फोन लावा तर प्रतिसाद नाही, स्थानिक कार्यालयात चौकशी करा तर ठोस माहिती नाही, अशी अवस्था आहे. वाढत्या तापमानामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. लहान मुले, वृद्ध, रुग्ण आणि महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. उकाड्यामुळे घरात बसणे कठीण झाले आहे. पंखे बंद, कुलर बंद, पाणीपुरवठ्याच्या मोटारी बंद, मोबाईल चार्जिंग बंद – त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक वीज खंडित झाल्याने नागरिकांची झोप मोडत असून सकाळी कामावर जाणार्यांचे हाल होत आहेत. व्यापारी वर्गालाही मोठा फटका बसत आहे. फ्रीज, कोल्ड स्टोरेज, संगणक, इंटरनेट सेवा, लघुउद्योग आणि दुकानदारांचे व्यवहार यावर थेट परिणाम होत आहे. सततच्या व्होल्टेज चढ-उतारामुळे उपकरणे जळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नुकसान भरपाईबाबत मात्र महावितरणकडून मौन पाळले जात असल्याचा आरोप होत आहे. महावितरणने आता सबबी सांगणे बंद करून प्रत्यक्ष कामाला लागण्याची वेळ आली आहे. शहरातील जुन्या लाईनचे तातडीने नूतनीकरण, ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ, अतिरिक्त तांत्रिक पथके, 24 तास तक्रार निवारण यंत्रणा, पारदर्शक माहिती प्रणाली आणि दोषी अधिकारी-कर्मचार्यांवर कारवाई या उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे. नांदेडकर कर भरतात, बिले वेळेवर भरतात, मग त्यांना दर्जेदार सेवा का मिळू नये? हा प्रश्न आता जनतेचा आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा वीजपुरवठ्याच्या अंधारातून संतापाचा ज्वालामुखी पेटल्याशिवाय राहणार नाही. महावितरणने जागे व्हावे, अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.

COMMENTS