नांदेड : नांदेड शहरालगतच्या तरोडा बुद्रुक व तरोडा खुर्द परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वीजखंडितीमुळे नागरिकांचा संताप अखेर

नांदेड : नांदेड शहरालगतच्या तरोडा बुद्रुक व तरोडा खुर्द परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वीजखंडितीमुळे नागरिकांचा संताप अखेर अनावर झाला. असह्य उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दिवसभर आणि रात्रीही वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत कार्यालयाला कुलूप ठोकून जोरदार निषेध नोंदविला.
सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. अशा वेळी दुपारच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार रोजच घडत असल्याने घरांतील महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. पंखे, कुलर, पाणीपुरवठा यंत्रणा आणि अन्य विद्युत साधने बंद पडत असल्याने नागरिकांना अक्षरशः घामाच्या धारांत दिवस काढावा लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुपारी वीज जाते ती पुन्हा केव्हा येईल याची काहीच शाश्वती नसते. रात्री नागरिक झोपेच्या तयारीत असतानाही अचानक वीज गुल होते. काही वेळा हा प्रकार पहाटेपर्यंत सुरू राहत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. वीज कधी येते आणि कधी जाते, याचा कोणताही नेम राहिलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. या भागात डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असून वीज नसल्याने रात्री नागरिकांना झोप घेणे कठीण झाले आहे. उकाडा, अंधार आणि डासांचा त्रास या तिहेरी संकटामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी केली. दरम्यान, वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी फोन केल्यानंतर संबंधित कर्मचारी फोन उचलत नाहीत, समाधानकारक उत्तर देत नाहीत, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठत अधिकार्यांना जाब विचारला. वेळेवर बिले भरणार्या ग्राहकांना जर नियमित सेवा मिळत नसेल, तर जबाबदार अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली. तरोडा परिसरातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS