Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणचा भोंगळ कारभार; तरोड्यात उकाड्यापेक्षा विजेच्या त्रासाने नागरिक हैराण

नांदेड : एकीकडे तापमानाने 43 अंशांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे नांदेड शहरातील तरोडा (खुर्द) आणि तरोडा (बुद्रुक) परिसरात महावितरणच्या अनियमित

पुण्यासह पिंपरी चिंचवडला पावसाने झोडपले; मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी ; नागरिकांची तारांबळ
सांगली-मिरजेला गारपिटीचा तडाखा
नेमकं महावितरणचं पाणी मुरतंय कुठं?बेजबाबदार कारभारामुळे नांदेडकर हैराण; वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा, नागरिकांचा संताप शिगेला
महावितरणचा भोंगळ कारभार

नांदेड : एकीकडे तापमानाने 43 अंशांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे नांदेड शहरातील तरोडा (खुर्द) आणि तरोडा (बुद्रुक) परिसरात महावितरणच्या अनियमित कारभारामुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे. सततचा कमी दाबाचा वीजपुरवठा, क्षणाक्षणाला होणारी वीज खंडिती आणि धोकादायक अवस्थेतील ट्रान्सफॉर्मर यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
तरोडा परिसरातील अनेक वसाहतींमध्ये दिवस-रात्र कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरातील पंखे केवळ नावालाच फिरत आहेत, कुलर आणि एसी निष्प्रभ ठरत आहेत, तर फ्रिजसारखी आवश्यक उपकरणेही व्यवस्थित काम करत नसल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक वीज गायब होत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे कमी दाबाच्या विजेमुळे आणि वारंवार होणार्‍या व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे अनेक घरांतील टीव्ही, फ्रिज, इन्व्हर्टर, मोटारी, संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खराब होत आहेत. नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असतानाही महावितरण प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान, अनेक ट्रान्सफॉर्मरमधून ऑइल गळती होत असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याच्या घटनांमुळे तासन्तास वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असून संपूर्ण परिसर अंधारात बुडत आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेत नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही अधिकार्‍यांकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने संताप अधिक वाढत आहे. वाढलेली लोकसंख्या, वाढलेला वीज वापर आणि कालबाह्य यंत्रणा यामुळे तरोडा परिसरातील वीज व्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे चित्र दिसत आहे.  नागरिकांनी तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, कमी दाबाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि जळालेल्या उपकरणांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

COMMENTS